मुंबई विद्यापीठाचा निकालगोंधळ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 03:03 AM2017-12-29T03:03:02+5:302017-12-29T03:03:19+5:30
मुंबई : मुंबई विद्यापीठातील निकालगोंधळ कायम असतानाच आता विधि अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेतील चुका समोर आल्या आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठातील निकालगोंधळ कायम असतानाच आता विधि अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेतील चुका समोर आल्या आहेत. संपूर्ण सत्र महाविद्यालयात बसून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालावर एग्जम्प्शन (वाढीव गुण) हा शेरा देण्यात आलेला आहे. याउलट संबंधित विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची सूट न मिळवता मेहनतीने मिळवलेले गुण असल्याची प्रतिक्रिया एका पीडित विद्यार्थिनीने दिलेली आहे. त्यामुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
प्रामुख्याने पाच वर्षीय विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आठव्या व दहाव्या सत्रासाठी देण्यात येणा-या गुणपत्रिकेवर चुकीचा शेरा देण्यात येत आहे. आठव्या सत्राच्या गुणपत्रिकेत सातव्या सत्रात वाढीव गुण दिल्याचे, तर दहाव्या सत्राच्या गुणपत्रिकेत नवव्या सत्रात वाढीव गुण दिल्याचा शेरा विद्यापीठाकडून देण्यात येत आहे. हा शेरा काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या नियंत्रकांपासून कुलसचिवांपर्यंत दाद मागितली आहे. मात्र अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील चुकीच्या शेºयाची टांगती तलवार कायम आहे.
याबाबत शासकीय विधि महाविद्यालयात शिक्षण घेणाºया मानसी भूषणने सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून हा सावळा गोंधळ सुरू आहे. यासंदर्भातील तक्रार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक तसेच कुलसचिवांकडे केली आहे. प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यादरम्यान ही चूक मान्य करत प्रशासनाने समिती नेमल्याचे सांगितले. मात्र ही समिती निश्चित निर्णय कधी घेणार याबाबत टोलवाटोलवीची उत्तरे सुरू आहेत.
>त्यांची काय चूक?
शासकीय विधि महाविद्यालयातील बहुतेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अतिरिक्त गुणांचा शेरा दिल्याची माहिती आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी प्रशासनाला सहीनिशी दिलेल्या निवेदनात असे कोणतेही अतिरिक्त गुण नसताना शेरा मिळाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. मात्र प्रशासनाकडून तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.
विद्यापीठाने संबंधित चूक मान्य केल्यानंतर शासकीय विधि महाविद्यालयाने चूक सुधारण्यासाठी प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला होता. सोबतच संबंधित शेरा काढून नव्याने गुणपत्रिका देण्याची मागणीही महाविद्यालयाने केली होती.त्याकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने अद्याप हा प्रश्न कायम आहे. त्यामुळे चुकांमध्ये दुरुस्ती करण्याऐवजी तोच कित्ता किती दिवस गिरवणार, असा सवाल निर्माण झाला आहे.