Join us

मुंबई विद्यापीठ दुस-यांदाही तोंडघशी, कारभारावर चहुबाजूंनी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 12:46 AM

मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली ३१ जुलैची पहिली डेडलाइन चुकल्यानंतर, विद्यापीठाच्या कारभारावर चहुबाजूंनी टीका झाली.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली ३१ जुलैची पहिली डेडलाइन चुकल्यानंतर, विद्यापीठाच्या कारभारावर चहुबाजूंनी टीका झाली. नंतर ५ आॅगस्टची दिलेली दुसरी डेडलाइनही विद्यापीठाला पाळता आलेली नाही. अजूनही २१२ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले नाहीत.यंदा एप्रिल महिन्यात कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार, निविदा प्रक्रिया सुरू केली. मात्र, त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळूनही आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी सुरू केली. त्यामध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे आॅगस्ट महिना उजाडूनही उत्तरपत्रिकांची तपासणी सुरूच आहे. मुंबई विद्यापीठाला सर्व ४७७ अभ्यासक्रमांचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ४ जुलै रोजी दिले होते, पण विद्यापीठाने ही डेडलाइन चुकविली. त्यानंतर, विद्यापीठाला पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. पण ही डेडलाइनही विद्यापीठ पाळू शकलेले नाही. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.१५ ला निकाल लागणार?मुंबई विद्यापीठाने स्वत:हून १५ आॅगस्टपर्यंत निकाल जाहीर होतील, असे स्पष्ट केले होते, पण आता विद्यापीठ स्वत:ची डेडलाइन तरी पाळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.