मुंबई विद्यापीठ : विद्यार्थी परिषदेवर युवा सेनेचे वर्चस्व! अभाविपला केवळ २ मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:32 AM2018-02-27T02:32:41+5:302018-02-27T02:32:41+5:30
विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया विद्यार्थी परिषदेवर अखेर युवा सेनेने वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात सोमवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष आणि सचिव पदावर बाजी मारत युवा सेनेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर कुरघोडी केली आहे.
मुंबई : विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाºया विद्यार्थी परिषदेवर अखेर युवा सेनेने वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात सोमवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष आणि सचिव पदावर बाजी मारत युवा सेनेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर कुरघोडी केली आहे. या निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी युवा सेना पुरस्कृत सानिया नाघुठणे हिने अभाविपच्या सूरज यादव याचा पराभव केला, तर सचिव पदी ग्रॅविल गोन्सालवीस हिची बिनविरोध निवड झाली. या दोन्ही पदांवरील विजयामुळे युवा सेनेचे सिनेटमधील संख्याबळ वाढले आहे. तत्पूर्वी या निवडणुकीत १३ विद्यापीठ प्रतिनिधींनी केलेल्या मतदानापैकी एक मत बाद झाल्यावरही सानियाला एकूण १० मते मिळाली, तर दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेल्या अभाविपच्या सूरजला निवडणुकीत केवळ दोन मतांवर समाधान मानावे लागले.
ग्रॅविल गोन्सालवीस यांची आधीच सचिव पदासाठी बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे अध्यक्ष व सचिव या दोन्ही पदांसह युवा सेनेचे विद्यार्थी प्रतिनिधी सिनेटमध्ये सामील होताना दिसतील.
‘निवडणुकीत घोडेबाजार’-
निवडणुकीत घोडेबाजार केल्याचा आरोप करत अभाविपने पराभवाचे खापर युवा सेनेवर फोडले आहे. अभाविप विद्यार्थ्यांना सामान्यपणे संपर्क करत असताना युवा सेनेने मात्र निवडणुकीत पैसा व सत्तेचा उपयोग केल्याचा आरोपही अभाविपने केला आहे. तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मंत्र्यांनी बैठक घेऊन ही निवडणूक घेणार नाही, असे सांगितले होते. तरी अभाविपने निवडणूक अर्ज भरल्याने अवघा एक तास असताना या फसवणुकीविरोधात आम्ही अर्ज भरत निवडून आलो, असे आदित्य यांनी स्पष्ट केले.