मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आज, युवासेनेची जोरदार तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 04:02 AM2018-03-25T04:02:33+5:302018-03-25T04:02:33+5:30
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आज २५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्र्यंत पार पडणार आहे. सिनेटसाठी यंदा युवासेनेने जोरदार तयारी केली असून, त्यांचे कडवे आव्हान भाजपाप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेसप्रणीत एनएसयूआयच्या उमेदवारांसमोर आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आज २५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्र्यंत पार पडणार आहे. सिनेटसाठी यंदा युवासेनेने जोरदार तयारी केली असून, त्यांचे कडवे आव्हान भाजपाप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि काँग्रेसप्रणीत एनएसयूआयच्या उमेदवारांसमोर आहे.
२०१० साली झालेल्या सिनेट निवडणुकीत युवासेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात, १० पैकी ८ जागा जिंकून मुंबई विद्यापीठावर भगवा फडकवून इतिहास रचला होता, तर अलीकडेच झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत, युवासेनेने अभाविपला धूळ चारली होती.
२०१०च्या सिनेटच्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांनुसार, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. वेळप्रसंगी विद्यापीठावर धडक देऊन अनेक आंदोलने छेडली, तर अनेक ऐवेळा राज्यपालांची भेट घेत, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याचे शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी सांगितले.
यंदा सर्वच्या सर्व उमेदवार निवडून यावेत, यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तसेच आदित्य ठाकरे नेतृत्वात मुंबईतील १२ विभागांतील सर्व आमदार, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, नगरसेवक, शाखाप्रमुख, युवासेना विभागाधिकारी ते गटप्रमुखांपर्यंत सर्व जण कामाला लागल्याचे चित्र होते.