विद्यापीठात हवे परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:06 AM2021-07-07T04:06:51+5:302021-07-07T04:06:51+5:30

मुंबई : मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दरवर्षी पंधरा हजाराहून अधिक विद्यार्थी आपले पुढील शिक्षण घेण्याकरिता परदेशी विद्यापीठांत ...

The university needs a guidance center for foreign education | विद्यापीठात हवे परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन केंद्र

विद्यापीठात हवे परदेशी शिक्षणासाठी मार्गदर्शन केंद्र

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दरवर्षी पंधरा हजाराहून अधिक विद्यार्थी आपले पुढील शिक्षण घेण्याकरिता परदेशी विद्यापीठांत जात असतात. त्यासाठी तेथील विविध विद्यापीठांत त्यांना प्रवेश अर्ज करावे लागतात, तेथील शिक्षणासाठी, राहण्या-खाण्याच्या सुविधांसाठी अनेकदा खासगी संस्थांची मदत घ्यावी लागते. दरम्यान, या प्रक्रियेत बहुतांश विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांचे पैसे आणि वेळ वाया जातो. अनेक विद्यार्थी योग्य मार्गदर्शनाअभावी या प्रक्रियेतूनच बाहेर पडतात. अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठातूनच शिक्षणासोबत परदेशी शिक्षणाच्या मार्गदर्शनाचीही सोय उपलब्ध झाली तर विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळू शकेल. त्यामुळे संकुलातच परदेशी शिक्षणाचे मार्गदर्शन सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी युवासेना सिनेट सदस्यांकडून मुंबई विद्यापीठाकडे करण्यात आली आहे.

विद्यापीठातील मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून परदेशी शिक्षण घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सेमिनार आयोजित करण्यात येतील. त्यांचे प्री एक्झामिनेशन, ट्रेनिंग घेण्यात येईल शिवाय समुपदेशनही करता येईल असे सिनेट सदस्यांनी कुलसचिव यांना पत्र लिहून सुचविले आहे. या मार्गदर्शन परदेशातील कुठल्या विद्यापीठांत कसा अर्ज करावा? तेथील सोयी, सुविधा याबाबतीतही विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन विद्यापीठातून मिळाले तर गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे खासगी संस्थांमागे वाया जाणारे पैसेही वाचू शकणार असल्याचे सिनेट सदस्यांकडून देण्यात आलेल्या पत्रात सुचविण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाने ज्या काही परदेशी विद्यापीठांशीही सामंजस्य करार केले त्याचाही उपयोग या विद्यार्थ्यांना होऊ शकेल असे त्यांनी सदर पत्रात म्हटले आहे. त्यामुळे हे सुविधा केंद्र विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दृष्टीने उपयुक्तच ठरेल यात वाद नाही, अशी प्रतिक्रिया सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.

Web Title: The university needs a guidance center for foreign education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.