विद्यापीठात विज्ञान, तंत्रज्ञानप्रेमींचा महापूर

By admin | Published: January 4, 2015 02:25 AM2015-01-04T02:25:26+5:302015-01-04T02:25:26+5:30

परीक्षा, निकाल, लेक्चर असे नित्य वातावरण असलेला मुंबई विद्यापीठाचा कलिना कॅम्पस शनिवारी विज्ञान, तंत्रज्ञानप्रेमींच्या महापुरात बुडाला.

University of Science, Technology | विद्यापीठात विज्ञान, तंत्रज्ञानप्रेमींचा महापूर

विद्यापीठात विज्ञान, तंत्रज्ञानप्रेमींचा महापूर

Next

मुंबई : परीक्षा, निकाल, लेक्चर असे नित्य वातावरण असलेला मुंबई विद्यापीठाचा कलिना कॅम्पस शनिवारी विज्ञान, तंत्रज्ञानप्रेमींच्या महापुरात बुडाला. देशभरातून आलेले वैज्ञानिक, विद्यार्थी सकाळी ७ वाजल्यापासून कॅम्पसमध्ये दाखल होत होते. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग घेतला.
इंडियन सायन्स काँग्रेससाठी देशभरातून वैज्ञानिक, विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तळ ठोकून बसले आहेत. मानवी विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान ही यंदाच्या परिषदेची थीम असून, देश-विदेशातील तब्बल १२ हजारांहून अधिक वैज्ञानिक यामध्ये सहभागी होणार आहेत. नोबेल विजेत्यांची व्याख्याने ऐकण्यासाठी विद्यार्थी उत्सुक आहेत. देशातील प्रत्येक विद्यापीठातील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले असून, त्यांच्या राहण्याची व्यवस्था विद्यापीठ करीत आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांची व्यवस्था करणे विद्यापीठाला शक्य झाली नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. परिषदेसाठी विद्यार्थी, वैज्ञानिक सकाळी सात वाजल्यापासूनच विद्यापीठात येण्यास सुरुवात झाली. यामुळे विद्यापीठाबाहेरील मार्गावर वाहतूककोंडी झाली.
मुंबईत नवख्या असलेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यास वेळ लागला. मुख्य सभामंडपात उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच उपस्थितांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

डबेवाल्यांचे
सफाई अभियान
इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याने विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील मेन गेटजवळ मुंबईच्या डबेवाल्यांनी सफाई अभियान राबविले. यामध्ये अनेक डबेवाले सहभागी झाले होते.

पोलीस
छावणीचे स्वरूप
इंडियन सायन्स काँग्रेस उद्घाटनासाठी पंतप्रधान येणार असल्याने विद्यापीठ परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यामुळे विद्यापीठाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.

विद्यार्थ्यांची धावपळ
परिषदेला उपस्थित राहण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. परिषद सुरू झाली तरी विद्यार्थ्यांची नोंदणी न झाल्याने दिवसभर नोंदणी सेंटरवर विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केली होती.
पुष्पगुच्छ देऊन स्वागत
विज्ञान परिषदेसाठी कलिनामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Web Title: University of Science, Technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.