मुंबई : राज्यातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी संशोधन करणा-यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विद्यापीठातील संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे.राज्यातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा, संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी राज्य शासन आणि राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत निधी मंजूर होतो. या निधीतून संबंधित विद्यापीठांना आवश्यक ते बांधकाम करण्याच्या परवानगीसाठी विशेष नियमावली तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.महाराष्ट्र राज्य ‘रुसा’ कौन्सिलची आढावा बैठक उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्यांनी सदर निर्देश दिले. विद्यार्थ्यांकरिता भौतिक सुविधांची निर्मिती, संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपक्रम, प्रयोगशाळांचे बळकटीकरण, संगणक प्रयोगशाळा निर्मिती, वसतिगृह नूतनीकरण, ग्रंथालय पुस्तके आणि ई-सुविधा, इ-कंटेन्ट लर्निंग मोड्युल आणि डिजिटल क्लासरूमची निर्मिती करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.या बांधकामावेळी नावीन्याचा वापर करण्याची आवश्यकता असून त्यातून उच्चशिक्षणाचा दर्जा वाढविण्याचे आवाहनही तावडे यांनी या वेळी केले. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास विभागाने उच्चस्तर शिक्षा योजनेंतर्गत प्रत्येक राज्यात शिक्षणाची गुणवत्ता राखून ठेवण्यासाठी तसेच यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी, निरीक्षणपद्धत सुलभ करण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी सेल तयार करण्यात आल्याचेही तावडे यांनी सांगितले. मंजूर निधीचे अचूक नियोजन करून वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचनाही तयांनी दिल्या.
विद्यापीठाने नवी नियमावली आखावी, संशोधनाच्या बांधकामासंदर्भात दिले निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 6:09 AM