- सीमा महांगडेपिल्लई महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सेम टू सेम निघाल्यामुळे, मुंबई विद्यापीठाने पेपर सेटर्सवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विद्यापीठाने याबाबतीत आधीच काळजी घेतली असती, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित असे धोक्यात आले नसते, अशी प्रतिक्रिया सिनेट सदस्य वैभव नरवडे यांनी दिली. मुंबई विद्यापीठातील पेपर सेटिंगची नेमकी काय प्रक्रिया असते, याची माहिती त्यांनी दिली.विद्यापीठात पेपरसेटर्सची प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र समिती असते का? काय नियम आहेत?मुंबई विद्यापीठातील प्रत्येक अभ्यासक्रमाच्या, प्रत्येक विषयाची जी अभ्यास मंडळे आहेत, ती प्रत्येक विषयासाठी एक त्रिसदस्यीय समिती पेपर सेटिंगसाठी गठीत करत असते. यामध्ये ३ सदस्य असून, त्यातील एक त्या दोघांचा चेअरमन म्हणून काम पाहत असतो. या चेअरमनने परीक्षांच्या वेळी विद्यापीठात बैठक घेऊन त्या-त्या विषयाची प्रश्नपत्रिका कशी असावी, याचा साचा ठरविणे अपेक्षित असते आणि तिथेच त्या तज्ज्ञांसोबत प्रश्नपत्रिका निश्चित करून विद्यापीठात ती सादर करणे अपेक्षित असते. हे पेपर सेटिंगचे नियम असले, तरी प्रत्यक्षात नियम धाब्यावर बसविले जात असल्याने हे प्रकार घडत आहेत.महाविद्यालय आणि विद्यापीठ यांच्या प्रश्नपत्रिका सेम टू सेम असल्याने समितीचे नियम धाब्यावर बसविले गेले का?हो, निश्चितच. पेपर विद्यापीठात सादर केल्याने पेपरफुटी होत नाही. या प्रकरणात चेअरमनने बैठकच घेतली नसल्यानेयांच्यात प्रश्नपत्रिकेचे समन्वयच साधला गेला नाही. प्रत्येकाने स्वत:चा प्रश्नपत्रिका संच देऊन नियमाची पायमल्ली केली. ज्या पेपरसेटरने पिल्लई महाविद्यालयाची तयार असलेली प्रश्नपत्रिका सादर केली आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार केला नाही. त्यानंतर, बैठक न झाल्याने यातील भोंगळपणा लक्षात आला नाही आणि विद्यापीठाकडून तीच प्रश्नपत्रिका परीक्षेला आली. प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याने हा प्रकार समोर आला.विद्यापीठाने याआधी कार्यवाही करणे अपेक्षित होते का?या आधीही विद्यापीठाकडून प्रश्नांची पुनरावृत्ती होणे, प्रश्न गाळणे असे प्रकार झालेले आहेत. मात्र, आत्तापर्यंत केवळ समित्या गठीत झाल्या. कागदी घोडे नाचविले गेले. मात्र, कारवाई झाली नाही. कारवाई होत नाही, हे लक्षात आल्यावर चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे धारिष्ट्य मात्र वाढले आणि अशा चुका वाढण्याला वाव मिळाला. या वेळची विद्यापीठाची कारवाई स्वागतार्ह आहे. मात्र, पुढेही असेही प्रकार घडल्यास अत्यंत कडक कारवाई करायला हवी.
आता विद्यापीठाकडून काय अपेक्षा आहेत?प्रत्येक विषयासाठी विद्यापीठाकडून स्वतंत्र समिती आहे. ही समिती बैठक घेते का? पेपर सेंटर्सकडून विविध प्रश्नपत्रिका संच विद्यापीठाला सादर होतात का? यावरही लक्ष ठेवणारी स्वतंत्र व्यवस्था विद्यापीठाकडून उभी केली जाणे अपेक्षित आहे. यामुळे या समित्यांवर विद्यापीठाचा अंकुश राहून अशा प्राध्यापक आणि तज्ज्ञांकडून हुशार विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळले जाईल.