Join us  

विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राचे निकाल वेळेवरच; योग्य नियोजन केल्याचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 9:34 AM

कोविडमध्ये विद्यापीठाने शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाइन परीक्षा घेतल्या. कोविडनंतर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्रात प्रथमच विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविडनंतर हिवाळी सत्रात मुंबई विद्यापीठात प्रथमच पदवी व पदव्युत्तर ऑफलाइन परीक्षा झाल्यानंतर निकालाचा गोंधळ उडाला होता. मात्र, मागील काही दिवसांत विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेमुळे उन्हाळी सत्राचे निकाल वेळेवर जाहीर करण्यात येतील, अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दिली.

कोविडमध्ये विद्यापीठाने शासनाच्या निर्देशानुसार ऑनलाइन परीक्षा घेतल्या. कोविडनंतर शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्रात प्रथमच विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या. यामध्ये मनुष्यबळाची कमतरता, विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संप व इतर कारणास्तव विद्यापीठाचे हिवाळी सत्राचे निकाल विलंबाने लागले; परंतु मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने गेल्या चार आठवड्यांपासून हिवाळी सत्राच्या परीक्षेतील त्रुटी दूर करून उन्हाळी सत्राच्या परीक्षेचे व निकालाचे नियोजन केले. तसेच उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राचार्यांच्या अनेक बैठका घेतल्याचेही प्रशासनाने सांगितले.

उन्हाळी सत्राचे २५ निकाल जाहीर२०२२-२०२३ या उन्हाळी सत्राच्या निकालास प्रारंभ झाला असून, आजपर्यंत २५ निकाल जाहीर झाले आहेत. सोमवारी रात्रीपर्यंत एकाच दिवशी १३ निकाल जाहीर केल्याचे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.

मूल्यांकनाची प्रक्रिया वेगाने सुरूमहाविद्यालयांचे प्राचार्य व प्राध्यापक तसेच विद्यापीठातील प्राध्यापक यांचे सहकार्य घेऊन मूल्यांकन करण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सुट्टीच्या काळातदेखील प्राध्यापक मूल्यांकन करीत आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत उन्हाळी सत्राचे २५ निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर केले आहेत.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ