मुंबई : प्रजासत्ताक दिनी मुंबई विद्यापीठाचे आदर्श शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेत्तर पुरस्कार जाहीर झाले. ग्रामीण विभागातून रायगडच्या माणगाव तालुक्यातील डी.जी. तटकरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक व प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर विल्सन महाविद्यालयातील वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक डॉ. सतिश भालेराव यांना शहरी विभागातील आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते प्राध्यापकांना सन्मानित करण्यात आले. गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कारांमध्ये ग्रामीण विभागातील पुरस्कार रत्नागिरीतील दादासाहेब पित्रे विज्ञान महाविद्यालयाचे अधीक्षक विवेक भोपटकर आणि शहरी भागातील पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातील अधीक्षक सदाशिव शेट्ये यांना देण्यात आला.‘अविष्कार’ या पुरस्कारावर पनवेलच्या सीकेटी महाविद्यालय आणि बॉम्बे कॉलेज आॅफ फार्मसी यांनी नाव कोरले. अध्यक्षीय भाषण डॉ. देशमुख म्हणाले की, भविष्यात मुंबई विद्यापीठात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प राबविले जाणार आहेत. त्यात आॅनलाईन अभ्यासक्रम राबविले जातील. ‘बीएस्सी इन एव्हीएशन’ हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. डिजीटल विद्यापीठ, कौशल्य विकास आधारीत अभ्यासक्रम असे उपक्रम विद्यापीठ राबविणार आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत विद्यापीठाला २६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. (प्र्रतिनिधी)
विद्यापीठाचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
By admin | Published: January 28, 2016 3:05 AM