पाणीटंचाईवर विद्यापीठाचे पालिकेकडे बोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 06:31 AM2024-05-11T06:31:57+5:302024-05-11T06:32:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये इमारती वाढल्याने पाण्याची गरजही वाढली. परंतु, पाठपुरावा करूनही विद्यापीठाला महापालिकेकडून ...

University's finger to the municipality on water shortage | पाणीटंचाईवर विद्यापीठाचे पालिकेकडे बोट

पाणीटंचाईवर विद्यापीठाचे पालिकेकडे बोट

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये इमारती वाढल्याने पाण्याची गरजही वाढली. परंतु, पाठपुरावा करूनही विद्यापीठाला महापालिकेकडून नवीन नळजोडणी मिळालेली नसल्याचे स्पष्ट करत विद्यापीठाच्या प्रशासनाने पाणीटंचाईचे खापर पालिकेवर फोडले आहे. विद्यापीठाच्या कलिना संकुलातील पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीवर ‘लोकमत’ ने ४ मे रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या वृत्ताची दखल घेत काही प्रश्न तातडीने सोडवले जातील, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

विद्यापीठाला दररोज पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने दिवसाला पाच-सहा टँकर पाणी बाहेरून मागवावे लागते. त्यासाठी ५० ते ६० हजार रुपये खर्च होत असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. कलिना संकुलात प्रशासकीय, निवासी, शैक्षणिक, वसतिगृहांच्या इमारती आहेत. बहुतांश सगळ्या इमारतींमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. त्यातून विद्यापीठाने इतर वापराकरिता लागणाऱ्या पाण्याकरिता पर्यायी सोयही केलेली नाही. पाण्याअभावी विद्यापीठाच्या उद्यानातील झाडेझुडपे मरून गेली आहेत. कलिना संकुलातील गैरसोयींवर, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर ‘लोकमत’ गेले काही दिवस वृत्त प्रकाशित केले आहे. 

यात एसी, इंटरनेट सुविधा नसल्याने २० कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या नॉलेज रिसोर्स सेंटरची दुर्दशा, पाण्याचा अभाव आणि देखभालीअभावी उद्यानांची लागलेली वाताहत, सर्वच इमारतींमध्ये जाणवणारी पाणीटंचाई, विद्यार्थिनींच्या होस्टेलमधील मेसच्या सुविधेचा अभाव, विद्यार्थी वसतिगृहातील कॅन्टीनमधील अन्नाचा निकृष्ट दर्जा इत्यादी गैरसोयींवर प्रकाश टाकण्यात आला होता. या वृत्ताची दखल घेत काही प्रश्न तातडीने सोडवले जातील, असेही विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.

तीन ते चार बोअरवेल 
विद्यापीठातील उद्याने, झाडे यांना शाश्वत पाणीपुरवठा सुरू राहावा याकरिता विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात यंदा तरतूद केली आहे. त्यातून तीन ते चार बोअरवेल तयार करण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठात कार्बन न्यूट्रल ग्रीन कॅम्पस योजना राबविण्यात येणार आहे. बोअरवेल खणण्याचे प्रयत्न याआधीही झाले होते, मात्र त्याला यश आले नसल्याचे एका प्राध्यापकाने सांगितले.

उद्यानांची देखभाल  
विद्यापीठातील ओस पडलेल्या उद्यानांची देखभाल करण्याकरिता राज्य सरकारची मदत घेतली जाणार आहे. सरकारकडील या विषयातील तज्ज्ञांच्या मदतीने विद्यापीठातील उद्यानांची निगा राखली जाईल, असे मोघम उत्तर देण्यात आले.

कॅन्टीनकरिता निविदा 
मुलांच्या वसतिगृहातील कॅन्टीनकरिता नव्याने निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच मुलींच्या ज्या होस्टेलच्या इमारतींना ओसी आहे, त्या ठिकाणी मेसची सुविधा सुरू केली जाईल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

Web Title: University's finger to the municipality on water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.