मुंबई : मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन मूल्यांकनातील त्रुटी दूर करण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून उत्तरपत्रिकेत काही बदल करत उत्तरपत्रिकांची छपाई केली. मात्र, तेथेही विद्यापीठ पुन्हा नेहमीप्रमाणे वादात सापडले आहे. या उत्तरपत्रिकांमध्ये विद्यापीठाने थेट विद्यार्थ्यांच्या नावाचा उल्लेख असलेला रकाना नमूद केला आहे. यामुळे परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांना नवा मार्ग मिळेल, अशी टीका जोर धरू लागली आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिकांमध्ये बदल करण्याची मागणी आता विद्यार्थी संघटनांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या नावाचा उल्लेख हा प्रशासकीय कामांसाठी करण्यात आला असून, त्याचा कोणताही परिणाम परीक्षा पद्धतीवर होणार नाही, असा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.
मुंबई विद्यापीठात नव्याने छापलेल्या या उत्तरपत्रिका गुरुवारपासून सुरू झालेल्या हिवाळी सत्र परीक्षांपासून विद्यार्थ्यांना दिल्या. यात पहिल्या पानावर विद्यार्थ्याच्या नावाचा रकाना आहे. मुळात उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोपनीय ठेवायची असताना, अशा प्रकारचा रकाना असल्याने विद्यार्थ्याचे नाव समजून त्याच्या गुणांत फेरफार करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आला आहे. या उत्तरपत्रिकांवर ज्या माहितीचा अंतर्भाव करण्यात आला आहे, त्या प्राध्यापकांपर्यंत पोहोचणार नसल्याचा दावा या वेळी विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत म्हणाले की, आतापर्यंत उत्तरपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांचे नाव नमूद करण्याची पद्धत नव्हती, पण अचानक विद्यापीठाने हा बदल केल्याने गैरप्रकार करण्यासाठी मोकळे रानच असणार आहे. त्यामुळे आमचा या उत्तरपत्रिकांना विरोध आहे. त्यामुळे या उत्तरपत्रिका मागे घेण्याची मागणी आम्ही विद्यापीठाकडे करणार आहोत. याबाबत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकलेला नाही.