विद्यापीठाचा विद्यार्थिकेंद्रित ७२४ रुपये कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:07 AM2021-03-14T04:07:09+5:302021-03-14T04:07:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : डिसेबल्ड फ्रेन्डली कॅम्पस, डिजिटल लायब्ररी, इन्क्युबेशन सेंटर सारख्या विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डिसेबल्ड फ्रेन्डली कॅम्पस, डिजिटल लायब्ररी, इन्क्युबेशन सेंटर सारख्या विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्यक्रम देत मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थिकेंद्रित असा २०२१-२२ वर्षातील ७२४ कोटींचा अर्थसंकल्प शनिवारच्या सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला. मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या अधिसभेत यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये रुपये ७८ कोटी ५३ लाखांची तूट दाखविण्यात आली आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देत विविध भागांमध्ये या वर्षीचा अर्थसंकल्प शनिवारी सादर करण्यात आला असून, यामध्ये विद्यापीठ उप परिसरातील पायाभूत सुविधांसह शैक्षणिक सुविधा, सिंधुदुर्ग उप परिसर, इन्क्युबेशन सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, डिजिटल युनिव्हर्सिटी, विद्यापीठ उप परिसर विकास, पालघर उपकेंद्र, दुर्गम भागातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, युनिव्हर्सल ह्यूमन व्हॅल्यू सेल, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य, लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र, अशा वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित विशेष अर्थसंकल्पीय तरतुदींसह विद्यापीठ सुधारणांवर भर देत विद्यार्थिकेंद्रित अर्थसंकल्प सिनेट बैठकीत सादर करण्यात आला.
याबरोबरच २०२१- २०२२ या वर्षामध्ये नियोजित व अपूर्ण राहिलेल्या बांधकामांना विशेष प्राधान्यक्रम देण्यात आले असून यामध्ये हिंदी व उर्दू भाषा भवन, खेळांचे इनडोअर संकुल, बाबू जगजीवन राम मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, शैक्षणिक कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल व सामुदायिक सभागृह, तत्त्वज्ञान केंद्र, प्रा. बाळ आपटे दालन, स्कूल ऑफ लँग्वेजेस इमारत (२ रा टप्पा), आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह (२ रा टप्पा), चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरिता निवासस्थान अशा नियोजित बांधकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
अंदाजपत्रकातील काही महत्त्वाच्या तरतुदी
डिसेबल्ड फ्रेन्डली कॅम्पसेस- २२ कोटी ५० लाख
इन्क्युबेशन सेंटर- २ कोटी ५० लाख
विद्यापीठ परिसराचे सुशोभीकरण - ५ कोटी
स्व. बाळासाहेब ठाकरे कला आणि सांस्कृतिक केंद्र- ९ कोटी
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची स्थापना- १ कोटी
सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीज- ८० लाख
सेंटर फॉर हिंदू फिलॉसॉफिकल स्टडीज- १० लाख
स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस- १० लाख
स्कूल ऑफ सोशल सायन्स - १० लाख
शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वसाहत - १ कोटी