पर्जन्य जलवाहिनीचे काम पूर्ण; ट्रॅकवर पावसाचे पाणी जमा होण्याची समस्या सुटली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर असलेली पर्जन्य जलवाहिनी मागील ७ वर्षे बंद होती. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या सिंथेटिक ट्रॅकचे नुकसान होण्याची शक्यता होती. सिनेट सदस्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर सोमवारी येथील पर्यावरण जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे आता ट्रॅकवर पावसाचे पाणी साचून होणारे नुकसान टाळता येईलच, शिवाय पावसाळ्यात ही विद्यापीठाचे खेळाडू आणि येथे प्रॅक्टिससाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल.
मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी विद्यापीठाच्या मरिन लाइन्स येथे असलेल्या क्रीडा संकुलात सिंथेटिक अॅथलेटिक ट्रॅक बनवण्यात आला असून ताे विविध खेळांसाठी महत्त्वाचा ठरेल. येत्या काळात या ट्रॅकवर अधिकाधिक खेळाडूंना प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी अॅथलेटिक अकादमीही सुरू करण्यात येणार होती. या ट्रॅकसाठी सुमारे ४.१६ कोटींचा खर्च करण्यात आला. राज्य सरकारने सव्वातीन लाख रुपयांचा निधी मागील वर्षी उपलब्ध करून दिला. या ट्रॅकचा सर्वाधिक वापर लघु आणि दीर्घ स्वरूपाच्या धावपट्टीच्या खेळांसोबतच बहुउद्देशीय खेळांसाठीही होतो. त्यामुळे हा ट्रॅक विद्यापीठाच्या मैदानात असला तरी मुंबईतील सर्व खेळाडूंना तो उपलब्ध आहे.
मात्र, गेली अनेक वर्षे येथील पर्जन्य जलवाहिनी बंद असल्याने पावसाचे पाणी या ट्रॅकवर साचून त्याचे नुकसान होण्याची भीती हाेती. बरीच वर्षे झाली या जलवाहिनीचे काम करून घेण्यासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या, तसेच कोर्टकचेऱ्याही सुरू होत्या. अखेर सिनेट सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला आणि हा विषय पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांच्यापुढे मांडल्यानंतर खेळाडूंची होणारी गैरसोय लक्षात घेत नवीन पर्जन्य जलवाहिनीच्या कामाला परवानगी देण्यात आली. त्यानुसार मुंबई महापालिका प्रभाग समिती अध्यक्ष रमाकांत रहाटे यांच्या दालनात मुंबई विद्यापीठ कुलसचिव बळीराम गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. मोहन अमृले, विद्यापीठ अधिकारी, मुंबई महापालिकेचे अधिकारी व सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे व सौ. शीतल शेठ देवरुखकर आदींच्या उपस्थितीत बैठका पार पडल्या आणि अखेर हे काम आता पूर्ण झाले आहे.
.........................