मुंबई - देशातील पंचतारांकित हॉटेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील ताजमहल पॅलेस हॉटेलमध्ये जाण्याची कित्येकांची इच्छा असते. गेट वे ऑफ इंडियाच्या दर्शनी भागात असलेल्या या हॉटेलमध्ये बसून निदान एकतरी कॉफी पिण्यास मिळावी अशी कित्येक सामान्य मुंबईकरांची अपेक्षा असते. हॉटेलच्या खाली उभं राहून केवळ सेल्फी काढण्यापलिकडे सामान्य मुंबईकर काहीच करू शकत नाही. पण तुम्हाला माहितेय का या ताजची उभारणी का आणि कोणी केली. ताजमहल पॅलेस हॉटेलविषयी आपण अनेक गोष्टी ऐकतो त्यातील काही न ऐकलेल्या आणि आश्चर्यकारक वाटणाऱ्या काही गोष्टी आपण पाहू.
ईर्ष्येतून झाली ताज हॉटेलची बांधणी
मुंबईतील प्रसिद्ध वॅटसन हॉटेलमध्ये एकदा जमशेदजी टाटा यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. या हॉटेलमध्ये केवळ इंग्रजांना येण्याची परवानगी होती, त्यामुळे भारतीयांसाठीही असेच एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेल असावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून १९०३ साली त्यांनी हे हॉटेल बांधलं. भारतात एका भारतीयालाच एखाद्या हॉटेलमध्ये प्रवेश नाकारतात, म्हणून त्यांच्या मनात इर्ष्या निर्माण झाली. टाटांसारख्या श्रीमंत व्यावसायिकाला एखाद्या हॉटेलमध्ये नाकारल्याने त्यांनी कसलाच अनुभव नसताना या क्षेत्रात येण्याचा विचार केला.
भारतीय बांधकाम
मुंबईत ब्रिटीशांनी बांधलेली अनेक बांधकामं आहेत. आपण या वास्तुंचं कौतुकही करतो. पण ताज हॉटेलसारख्या वास्तुचं बांधकाम भारतीयांनी केलं आहे. त्यातही या हॉटेलचे वास्तुविशारद रावसाहेब सिताराम खंडेराव वैद्य या मराठी माणसाने केलं आहे. त्यांना डी.एन. मिर्झा यांनीही मदत केली आहे. पण बांधकाम पूर्ण करण्याचं काम डब्ल्यू. ए. चेंबर्स या इंग्रजी अभियांत्रिकाने केलं आहे. कामकाज पूर्ण होत असताना वास्तुविशारद वैद्य यांचे निधन झाल्याने डब्ल्यू.ए.चेंबर्स यांच्याकडे हे बांधकाम सोपावण्यात आलं असल्याचं म्हटलं जातं.
ताजचा घुमट मुंबईची ओळख
ताज हॉटेलमध्ये २४० फुट उंच असलेले घुमट मुंबईची ओळख आहे. ताज बांधल्याच्या २० वर्षांपर्यंत तरी गेट वे ऑफ इंडिया बांधला नव्हता त्यामुळे हे घुमटच त्या शहराची ओळख बनली असल्याचे काहीजण सांगतात. आजही या भारतीय नौदलांच्या जहांजांसाठी आजही हे घुमट म्हणजे मुख्य ओळख असल्याचं सांगण्यात येतं.
इर्म्पोटेड बांधकाम साहित्य
भारतात सरकता जिना आणण्याचा पहिला मानही जमशेदजी टाटा यांनाच जातं. कारण त्यांनीच आपल्या हॉटेलच्या उभारणीसाठी सरकता जिना बसवून घेतला होता. त्याचप्रमाणे हॉटेलमधील पंखे, जिने, स्नानगृहासाठी लागणारे बांधकाम साहित्य अमेरिका, जर्मन, तुर्कस्तान अशा देशांमधून मागविण्यात आले होते. त्याचा घुमट आयफेल टॉवरसाठी वापरलेल्या स्टीलपासून बनविण्यात आला असून हे स्टील त्या वेळी टाटांकडूनच आयात केले जात होते.
सुरुवातीपासूनच महागडे हॉटेल
१६ डिसेंबर १९०३ साली जेव्हा या हॉटेलचा पहिला दरवाजा उघाडला तेव्हा जवळपास १७ ग्राहकांनी यावेळी प्रवेश केला होता. त्यावेळेस एका खोलीची किंमत १० रुपये होती. तसेच, पंखा, शौचालय, बाथरुम अशा सुविधा असलेल्या खोलीची किंमत ३० रुपये आकारण्यात आली होती. म्हणजे अगदी हॉटेलच्या सुरुवातीपासूनच हे हॉटेल फक्त श्रीमंतासाठी बांधण्यात आलं होतं.
पहिल्या महायुद्धात होते हॉस्पिटल
हे हॉटेल कायमस्वरूपी हॉटेल नव्हते. पहिल्या महायुद्धाच्यावेळी या हॉटेलचं रुपांतर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलं होतं. जवळपास ६०० बेडचं हे हॉस्पिटल होतं.
फ्रान्समधील स्वयंपाकी
हॉटेलच्या पहिल्या चाळीस वर्षांत येथे फ्रेंच शेफ होते. मुख्य मेन्यू या फ्रेंच शेफ यांच्याकडूनच बनवला जायचा. शिवाय जेवण बनवण्यासाठी लागणारे साहित्यही फ्रेंचमधूनच मागविण्यात येत असत.
ग्रीन हॉटेलवरही कब्जा
ताज पॅलेसच्या बाजूला असलेली टोलेजंग इमारत ग्रीन हॉटेल म्हणून प्रसिद्ध होती. या हॉटेलमध्ये अगदी कमी किंमतीत जेवण मिळत असे. पण १९७३ साली टाटांनी हे हॉटेल विकत घेतले. आणि त्याठिकाणी ताजची दुसरी टोलेजंग इमारत बांधली.