विजय मल्ल्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट, किंगफिशरची याचिका फेटाळली
By admin | Published: April 18, 2016 05:10 PM2016-04-18T17:10:56+5:302016-04-18T17:33:46+5:30
किंगफिशर एअरलाईन्सची याचिका फेटाळल्यानंतर विशेष न्यायालयाने सोमवारी विजय मल्ल्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - ९०० कोटींच्या मनी लॉंडरींग प्रकरणात विशेष न्यायालयाने सोमवारी उद्योगपती विजय मल्ल्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. ईडीच्या याचिकेवर विशेष न्यायाधीश पी.आर.भावके यांनी हा आदेश दिला. या आदेशामुळे मल्ल्या विरोधात इंटरपोलचा रेड कॉर्नर अलर्ट जारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायालयाने हा आदेश देतानाच किंगफिशर एअरलाईन्सची याचिका फेटाळून लावली. आयडीबीआय बँकेकडून मिळालेल्या कर्जातील ४३० कोटी रुपये मल्ल्या यांनी परदेशात संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरल्याचा ईडीचा आरोप किंगफिशरने फेटाळून लावला.
४३० कोटी रुपये परदेशात संपत्ती खरेदी करण्यासाठी वापरले या ईडीच्या दाव्याला किंगफिशर एअरलाईन्सने आव्हान दिले होते. मात्र न्यायालयाने किंगफिशरची याचिका फेटाळून लावली.