बेकायदा बांधकामे ही तुमचीच जबाबदारी! - पालिका आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 05:13 AM2018-01-06T05:13:48+5:302018-01-06T05:14:20+5:30
कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या चौकशीत ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्ट्रो रेस्टॉरेंट’, पबमध्ये मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी कानावर हात ठेवले आहेत.
मुंबई - कमला मिल कंपाऊंडमधील आगीच्या चौकशीत ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्ट्रो रेस्टॉरेंट’, पबमध्ये मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी कानावर हात ठेवले आहेत. तरीही त्यांना अभय दिल्याने आयुक्त अजय मेहताच अडचणीत आले. मात्र मासिक आढावा बैठकीत आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना त्यांनी फैलावर घेतले. सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागात सतर्क राहावे, असेही बजावले. बेकायदा बांधकामांना प्रतिबंध करण्याची सूचना करीत आयुक्तांनी त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीवही करून दिली आहे.
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या या दोन्ही रेस्टॉरंटमध्ये असंख्य अनियमितता चौकशी अधिकाºयांना आढळून आल्या आहेत. या जागेला आॅफिसची परवानगी होती, ‘वन अबव्ह’मधील शौचालय बेकायदा होते, अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविलेले होते, अशा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात रेस्टॉरंटसाठी वापरात बदल करण्याची परवानगी व अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप असलेले जी दक्षिण विभागाचे पाच अधिकारी निलंबित आहेत. मात्र विभागाचा प्रमुख असलेले सहाय्यक आयुक्त सपकाळे यांची केवळ बदली करण्यात आली.
सहाय्यक आयुक्ताला आपल्या विभागातील प्रत्येक घडामोडींची माहिती असणे अपेक्षित असते. त्यामुळे सपकाळे यांची केवळ बदली केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु या घटनेने विभागीय सहाय्यक आयुक्तांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्त अजय मेहता यांनी मासिक आढावा बैठकीत सहाय्यक आयुक्तांची खरडपट्टी काढली.
बेकायदा बांधकामांवर बाराकाईने लक्ष ठेवणे, इमारत व कारखाने खात्यातील अधिकारी व कर्मचाºयांकडून चांगले काम करून घेणे व व्यावसायिक तक्रारदारांशी संगनमत करुन नागरिकांना त्रास देणाºयांवर कठोरात कठोर कारवाई करणे, गरजेचे आहे, ती झालीच पाहिजे, असे आदेश आयुक्तांनी यावेळी अधिकाºयांना दिले.
आतापर्यंत पाच अधिका-यांचे निलंबन
२९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत १४ लोकांचा मृत्यू तर ५५ जण जखमी झाले होते. या प्रकरणात जी दक्षिण विभागातील इमारत व कारखाने खात्याचे पदनिर्देशित अधिकारी मधुकर शेलार, दुय्यम अभियंता दिनेश महाले, कनिष्ठ अभियंता धनराज शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे आणि सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी एस. एस. शिंदे या पाच अधिकाºयांचे निलंबन करण्यात आले आहे.
इमारत प्रस्ताव विभागाने सीसी दिली नसताना तसेच गच्चीवरील या दोन रेस्टॉरंटला आॅफिसची परवानगी असताना जी दक्षिण विभागाच्या आरोग्य खात्यातून उपहारगृहाचा परवाना मिळाला होता, असे उजेडात आले आहे.