Join us  

बेकायदा बांधकामांना अभय नाहीच

By admin | Published: October 24, 2015 1:25 AM

बेकायदा बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून काहीशी बॅकफूटवर आलेल्या सिडकोने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पावसाळ्यामुळे अतिक्रमणावरील कारवाईची गती कमी झाली

नवी मुंबई : बेकायदा बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून काहीशी बॅकफूटवर आलेल्या सिडकोने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पावसाळ्यामुळे अतिक्रमणावरील कारवाईची गती कमी झाली होती. मात्र आता पुन्हा मोहीम तीव्र करण्यात येणार असून, कोणत्याही प्रकारच्या बेकायदा बांधकामाची गय केली जाणार नाही, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी स्पष्ट केले आहे.जानेवारी २0१३ नंतरच्या बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार चार महिन्यांपूर्वी सिडकोने कारवाईचा धडका सुरू केला होता. याअंतर्गत नवी मुंबई, पनवेल व उरण तालुक्यातील अनेक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. मात्र गावठाणातील बांधकामांवरील कारवाईला प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविल्याने काही तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत सिडकोने ही मोहीम थांबविली. तेव्हापासून म्हणजेच मागील चार महिन्यांपासून सिडकोची अतिक्रमण विरोधी मोहीम कायमची थंडावली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना कोणत्याही बेकायदा बांधकामाला अभय मिळणार नाही, अशी सिडकोची भूमिका असल्याचे भाटिया यांनी स्पष्ट केले. अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून २११ बांधकामांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच या बांधकामांवर कारवाई केली जाईल. उर्वरित बांधकामांवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाईल, असे भाटिया यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)