मीरारोड - माहिती अधिकार अंतर्गत माहिती घेण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थी तथा माहिती अधिकार कार्यकर्त्यास अर्वाच्च शब्दात दमदाटी केल्या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात पालिका अधिकाऱ्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कृष्णा गुप्ता या माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या प्रथम अपिलीय अर्जावर झालेल्या सुनावणीत उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी विनामूल्य माहिती देण्यास सांगितले होते. शिवाय एका प्रकरणात कोकण विभागीय माहिती आयुक्तांनी पालिकेस गुप्ता यांना शंभर रुपये अदा करण्याचे आदेश देखील सप्टेंबर मध्ये दिले होते.
त्या अनुषंगाने गुप्ता हे माहिती घेण्यास आज गुरुवारी सामान्य प्रशासन विभागात गेले होते. तेथे पालिका अधिकारी अविनाश जाधव यांनी गुप्ता यांना अर्वाच्च आणि अरेरावीची भाषा वापरून दमदाटी केली. या प्रकरणी गुप्ता यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांची भेट घेऊन घडला प्रकार सांगितला. गुप्ता यांच्या फिर्यादी नंतर पोलीसांनी अविनाश जाधव वर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे .
अविनाश जाधव यांनी या आधी देखील एका कारवाई दरम्यान सार्वजनिक ठिकाणी पालिकेतील त्यांचे वरिष्ठ अधिकारी उपअभियंता किरण राठोड यांना अर्वाच्च व अश्लील शिवीगाळ केली होती. या प्रकरणी राठोड सह महापौर डिंपल मेहता, आमदार नरेंद्र मेहता यांनी कारवाईची मागणी केली होती. शिवाय अनधिकृत बांधकामा ना ते संरक्षण देत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. पण आयुक्तांनी त्यावर कठोर कारवाई केली नव्हती.
भारिप चे सुनील भगत यांना सुध्दा जाधव यांनी दमदाटी केली होती. भगत यांनी देखील जाधव यांच्या विरोधात काशीमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.