Join us  

नालेसफाईच्या कामात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा

By admin | Published: May 27, 2014 12:22 AM

नालेसफाईच्या कामात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी नाल्यातून काढलेला गाळ पुन्हा नाल्यात डम्प केला जात असल्याचे आढळून आले आहे.

नवी मुंबई : नालेसफाईच्या कामात ठेकेदारांकडून हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी नाल्यातून काढलेला गाळ पुन्हा नाल्यात डम्प केला जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदारांकडून महापालिकेची तिजोरी साफ केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळापूर्व कामांतर्गत पालिकेतर्फे नाले, गटारे सफाईचे काम ठेकेदारामार्फत करून घेतले जात आहे. यासाठी एकूण आठ कोटी रु पयांचा निधी खर्च केला जाणार आहे. त्यापैकी २ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी हा नाले सफाईवर खर्च होणार आहे. परंतु नालेसफाईच्या कामात ठेकेदारांकडून प्रत्यक्ष कामामध्ये हलगर्जीपणा होत आहे. घणसोली येथील मोठ्या नाल्याच्या सफाई कामात ठेकेदाराकडून हातसफाईने प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याचे आढळून आले आहे. हा नाला औद्योगिक क्षेत्राला जोडलेला आहे. त्यामुळे यात पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ व घनकचरा वाहून तो नाल्याच्या काठावर साचतो. मात्र सफाईच्या नावाखाली काठावर साचलेला हा गाळ जेसीबीने उचलून तो पुन्हा नाल्याच्या मध्यभागी टाकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होवून पुरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. गाळ नाल्याबाहेर काढण्याचे ठेकेदारांना सूचित करण्यात आले आहे. घणसोली येथे किनार्‍याचा गाळ उचलून नाल्यातच टाकला जात असल्यास या प्रकाराची चौकशी केली जाईल असे पालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)