Unlock 1: मनसे आमदाराचा राज्य सरकारला जाब; ‘या’ प्रश्नाचं उत्तर तेव्हाही नव्हतं अन् आजही नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:43 PM2020-06-08T17:43:06+5:302020-06-08T17:45:13+5:30
खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणं सुरु केल्याने बेस्ट बसेस आणि अन्य वाहनांसाठी चाकरमान्यांनी गर्दी केली
मुंबई – कोरोना रोखण्यासाठी गेल्या २ महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये आजपासून काही शिथिलता आणण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेन या अंतर्गत निर्बंध शिथील करुन खासगी कार्यालये, दुकाने, बाजारपेठा खुला करण्यात आल्या. मात्र आठवड्याच पहिल्याच दिवशी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र शहरांमध्ये दिसून आलं.
मरिन लाईन्स, ठाणे, कल्याण-डोंबिवली या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांना उपस्थित राहणं सुरु केल्याने बेस्ट बसेस आणि अन्य वाहनांसाठी चाकरमान्यांनी गर्दी केली, डोंबिवलीत बसमध्ये चढतानाचा व्हिडीओ पाहून सोशल डिस्टेंसिंगचा कशारितीने फज्जा उडाला याचं उदाहरण पाहायला मिळालं. शहरातील एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा दिसून आल्या. कल्याण-डोंबिवली या भागातून मोठ्या संख्येने कर्मचारी मुंबईच्या दिशेने कामाला येतात.
पुनश्च हरिओम म्हणत सुरु केलेल्या राज्य सरकारने लोकल ट्रेन्स सुरु नाहीत, अपुऱ्या बसेसशिवाय अनलॉक १ सुरु केलं. त्यामुळे मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला तुमचा लॉकडाऊन एक्झिट प्लॅन काय? असा सवाल विचारला होता, सरकारकडे या प्रश्नाचं उत्तर तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही, लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन आणि धोरण दिसत नाही अशी टीका मनसेने केली आहे.
"तुमचा #lockdown_exit_plan काय ?” असा सवाल मा.राजसाहेबांनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन व धोरण दिसत नाही.@CMOMaharashtra@OfficeofUT@PawarSpeakspic.twitter.com/vzBbYrDJFU
— Raju Patil (@rajupatilmanase) June 8, 2020
लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचा आजचा पहिला दिवस असून खासगी कंपन्यांची कार्यालये १० टक्के मनुष्यबळासह सुरु होत आहेत. तर अन्य कर्मचाऱ्यांना घरूनच काम करावे लागणार आहे. शॉपिंग मॉल, हॉटेल, धार्मिक स्थळे तूर्त खुली केली जाणार नाहीत. तसेच लोकल, परिवहन सेवा, रिक्षा-टॅक्सी यांच्यावरील सध्याचे निर्बंध कायम असतील. आजच्या पहिल्या दिवशी वाहतुकीचा पुरता फज्जा उडालेला आहे. नोकरदार वर्गाने बस पकडण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावल्याचे डोंबिवलीत दिसून आले, तर मुंबईत विलेपार्ले येथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांना परवानगी असताना ही परिस्थिती उद्भवली आहे. सरकारी बस, बेस्टच्या बस पुरेशा उपलब्ध नसल्याने तसेच कोरोनाच्या भीतीने अनेकांनी खासगी वाहने रस्त्यावर उतरवली होती.