Unlock 2: हॉटेलांमध्ये तूर्त जाणार नाही; रेल्वे, मेट्रोचा वापरही नको; लोकांच्या मनात भीती कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 03:37 AM2020-07-01T03:37:50+5:302020-07-01T06:54:21+5:30
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६७ टक्के लोकांनी आम्ही आणखी किमान एक महिना तरी रेल्वे वा मेट्रोने प्रवास करणार नाही, असे सर्वेक्षणात म्हटले आहे,
नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभर लागू केलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात असले आणि काही सेवा सुरू करण्यात येत असल्या तरी लोकांच्या मनात या संसर्गजन्य आजाराबद्दल असलेली भीती मात्र अद्याप कायम आहे, असे एका सर्वेक्षणातून आढळून आले आहे. हॉटेलांमध्ये जेवायला जायला वा रेल्वे वा मेट्रोने प्रवास करायला ५0 टक्क्यांहून अधिक लोकांची तयारी नाही, असे या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत.
देशातील २४१ जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात तब्बल २४ हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले. त्यातून लोकांना अद्याप घराबाहेर पडण्यास काहीशी भीती वाटत आहे आणि कामाशिवाय अन्यत्र जाण्यास ते तयार नाहीत, असे दिसून आले.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६७ टक्के लोकांनी आम्ही आणखी किमान एक महिना तरी रेल्वे वा मेट्रोने प्रवास करणार नाही, असे सर्वेक्षणात म्हटले आहे, तर ९३ टक्के लोकांनी हॉटेलांमध्ये राहण्याची सध्या तयारी दिसत नाही, असे हे सर्वेक्षण सांगते. काही ठिकाणी जिम, स्विमिंग पूल सुरू झाले वा होत असले तरी तिथेही जाण्याची लोकांची तयारी दिसत नाही. तब्बल ८४ टक्के लोकांनी आम्ही तिथे जाण्यापेक्षा घरीच व्यायाम करू, असे म्हटले आहे. केवळ १५ टक्के जणांनी आम्ही जिम, स्विमिंग पूलमध्ये जाण्याच्या विचारात आहोत, असे म्हटले आहे.
सार्वजनिक वाहनांचा घेतला धसका
गेल्या काही दिवसांत पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने मोठी वाढ सुरू आहे. त्यामुळे खासगीऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यावर नागरिकांचा भर असेल, असा अंदाज होता. पण तूर्त सार्वजनिक वाहतूक नको रे बाबा, असाच लोकांचा कल दिसत आहे.