मुंबई : गुरुवारपासून राज्यातील मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आठवडाबाजार, सरकारी आणि खासगी ग्रंथालये उघडण्याची परवानगी देण्यात आली असून दुकानांच्या वेळाही दोन तासांनी वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, प्रार्थनास्थळे, शाळा-महाविद्यालये आणि जिम उघडण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. प्रतिबंधित बाबी टप्प्याटप्प्याने उघडण्याचा सरकारचा मानस असल्याचे बुधवारी जारी करण्यात आलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत राज्य सरकारने बुधवारी नवीन नियमावली जारी केली. यात प्रतबंधित क्षेत्रातील निर्बंध पुढील आदेशापर्यंत जारी ठेवण्यात आले. याशिवाय, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच ठेवण्यात येणार आहेत. मात्र, ऑनलाइन शिक्षणाच्या कामांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ५० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील संस्थांसाठी लागू असेल. मुंबईत सोमवारी १९ आॅक्टोबरपासून मेट्रो सुरु होणार आहे.विमान, रेल्वे प्रवाशांच्या हातावरील शिक्के हद्दपारराज्यात विमान अथवा रेल्वे प्रवाशांची कोरोनाच्या लक्षणासाठी नेहमीप्रमाणे तपासणी चालू राहील. मात्र, यापुढे प्रवाशांच्या हातावर शिक्के मारले जाणार नसल्याचे आजच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.आजपासून काय सुरू होणार?
- आजपासून दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत सुरु राहतील.
- राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य आणि उद्योजगता प्रशिक्षणाला तसेच राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ, राज्य कौशल्य विकास अभियान, केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण द्यायलाही परवानगी
- उच्च शिक्षण संस्थांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील पदव्युत्तर तसेच पीएच.डी.चे शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा आणि प्रयोगाशी संबंधित कार्यांना अनुमती
- सरकारी व खासगी ग्रंथालये उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाबाबतची नियमावली पाळणे बंधनकारक असणार आहे.
- प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बिझनेस टू बिझनेस या व्यापारविषयक प्रदर्शनांनाही नियमावलीअंतर्गत परवानगी
- जनावरांच्या बाजारांसह आठवडाबाजार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
चार राज्यांत आजपासून थिएटर्स सुरू होणार१५ ऑक्टोबरपासून थिएटर्स सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता उद्यापासून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि हरयाणा येथील लोकांना अनेक महिन्यांनी पहिला शो पाहता येईल.मुंबईत मेट्रो १९ तर मोनो १८ ऑक्टोबरपासून धावणारवर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर मेट्रो १९ ऑक्टोबरपासून, तर वडाळा-चेंबूर-संत गाडगे महाराज चौक या मार्गावर मोनोरेल १८ ऑक्टोबरपासून धावणार आहे.