Unlock: मुंबईत दुकाने रात्री साडेनऊ, तर हॉटेल, रेस्टॉरंट साडेअकरापर्यंत राहणार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 03:08 AM2020-10-16T03:08:08+5:302020-10-16T03:08:25+5:30
Coronavirus Unlock News: मुंबई महापालिकेचे सुधारित परिपत्रक, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार
मुंबई : व्यापारी संघटनांच्या मागणीनुसार मुंबईतील दुकाने, बाजारपेठ, आस्थापनांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यानुसार आता सकाळी ७ ते रात्री ९.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. तर हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बारदेखील स. ९ ते रात्री ११.३० या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील सुधारित परिपत्रक मुंबई महापालिका प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले
आहे.
‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत जून महिन्यात मुंबईतील दुकाने, बाजारपेठ, आस्थापना सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्यांची वेळ स. ९ ते सं. ७ अशी होती. तसेच ५ ऑक्टोबरपासून मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट व बार ३३ टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची मंजुरी मिळाली आहे. मात्र या वेळेत वाढ करून मिळण्याची मागणी व्यापारी संघटनांकडून केली जात होती. ही मागणी पालिका प्रशासनाने अखेर मान्य केली आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार
दुकाने व बाजारपेठ सुरू ठेवण्याची वेळ आता सकाळी ७ ते रात्री ९.३०, तर हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट व बार यांची वेळ स. ९ ते रात्री ११.३० असणार आहे. मात्र सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. तसेच मास्कचा वापर व गर्दी टाळण्यासाठी अन्य उपाययोजनाही कराव्या लागणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू राहणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास कलम १८८ अंतर्गत कारवाईचा इशाराही पालिका प्रशासनाने दिला आहे.