नितीन जगताप मुंबई : कोणतेही संकट आले तरी मुंबई थांबत नाही, मग तो दहशतवादी हल्ला असो किंवा पूर. आलेल्या संकटाला जिद्दीने सामोरे जाऊन मुंबई पुन्हा उभी राहते असे म्हटले जाते. पण कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र आता हळूहळू सर्व अनलॉक होत असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबलेले बाजाराचे चाक पूर्वपदावर येत आहे.
मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. उच्चभ्रू वस्तीपासून दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये या महामारीचा प्रादुर्भाव वाढत गेला. अत्यावश्यक सेवा वगळता मॉल्स, दुकाने, मल्टिप्लेक्स, सर्व व्यापारी संकुले, खासगी व सरकारी कार्यालयेही बंद ठेवण्यात आली. यामुळे गेल्या सात महिन्यांत मुंबईचे तसेच देशाचे हजारो कोटींचे आर्थिक नुकसान झाले. शहरातील पायाभूत प्रकल्प आणि विकासकामांनाही खीळ बसली. जूनपासून अनलॉक होण्यास सुरुवात झाली. आता अनेक उद्योग सुरू झाले असून, परिस्थिती सुधारत आहे.
याबाबत एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक आणि अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे म्हणाले, मुंबईत येणारी व्यक्ती व्यवसाय आणि रोजगार याच्या अपेक्षेने येते. मुंबई किंवा लगतच्या परिसरात काम करते. मुंबईत काम केल्यानंतर पगार इतर शहरांच्या तुलनेने जास्त मिळतो. त्यामुळे देशभरातून कामगार येत असतात. माथाडींमध्ये यूपी, बिहार, पश्चिम बंगाल आदी ठिकाणांहून कामगार मुंबईत येतात. मुंबईत वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता कामगार मुंबईला येणे टाळत आहेत. मुंबईत रेल्वे वाहतूक सुरू नाही.
कोणते उद्योग सुरू होत आहेत?
सेवा क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, टेलिकम्युनिकेशन, फूड सेक्टरशी संबंधित कंपन्या, मुंबईतील जे लघुउद्योग, लेबर वर्कचे काम करणारे, गारमेंटचे काम करणारे तसेच घरगुती उद्योग, हॉटेल क्षेत्र सुरू झाले आहे. बाहेर गेलेले कामगार परत येत आहेत.
गेल्या दोन महिन्यांत अनेक उद्योग सुरू आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. आता पैसे मिळत आहेत त्यामुळे सुधारणा झाली आहे. - एच शंकर, उद्योजक
अनलॉक झाल्यामुळे उद्योगांमध्ये ४० ते ६० टक्के सुधारणा झाली आहे. पण, पूर्णपणे सुधारणा होण्यास वर्षभराचा कालावधी लागेल.- संतोष कांबळे, उद्योजक
उद्योजक दोन ते तीन महिन्यांपेक्षा जास्त नियोजन करीत नाहीत. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँक अर्थपुरवठा करीत नाहीत. कामगारांचा तुटवडा आहे. - चंद्रकांत साळुंखे, अध्यक्ष, एसएमई चेंबर ऑफ इंडिया