मुंबई : कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचा आजचा पहिला दिवस असून खासगी कंपन्यांची कार्यालये १० टक्के मनुष्यबळासह सुरु होत आहेत. तर अन्य कर्मचाऱ्यांना घरूनचा काम करावे लागणार आहे. शॉपिंग मॉल, हॉटेल, धार्मिक स्थळे तूर्त खुली केली जाणार नाहीत. तसेच लोकल, परिवहन सेवा, रिक्षा-टॅक्सी यांच्यावरील सध्याचे निर्बंध कायम असतील.
आजच्या पहिल्या दिवशी वाहतुकीचा पुरता फज्जा उडालेला आहे. नोकरदार वर्गाने बस पकडण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावल्याचे डोंबिवलीत दिसून आले, तर मुंबईत विलेपार्ले येथे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांना परवानगी असताना ही परिस्थिती उद्भवली आहे. सरकारी बस, बेस्टच्या बस पुरेशा उपलब्ध नसल्याने तसेच कोरोनाच्या भीतीने अनेकांनी खासगी वाहने रस्त्यावर उतरवली आहेत.
ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉक डाऊनचा घोषित करण्यात आले होते . पण सोमवार पासून खाजगी कार्यालय १० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे अनलॉक १ च्या पहिल्याच दिवशी अनेकजण आपली वाहने घेऊन घराबाहेर पडले त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस वे वर बांद्रा,कांदिवली दहिसर भागात वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.