बेवारस नौका आढळली
By Admin | Published: May 1, 2015 12:13 AM2015-05-01T00:13:39+5:302015-05-01T00:14:23+5:30
विजयदुर्गातील घटना : लाईफ बोट असल्याचा दावा
पुरळ : विजयदुर्ग समुद्रकिनारी बेवारस व संशयास्पदरीत्या छोटी नौका आढळल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे. समुद्रमार्गे दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर ही नौका आढळून आल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सुरक्षा यंत्रणेने ही नौका संशयास्पद नसल्याचे स्पष्ट केले आहे. ही लाईफ बोट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
रामेश्वर-खवसीवाडी येथील सागर सुरक्षा दलाचे सदस्य शाबीन परेरा यांचे घर समुद्रकिनारी असून, गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ते मच्छिमारी करण्यासाठी किनारपट्टी भागात गेले असतानाच समुद्र किनाऱ्यापासून ५५ मीटर अंतरावर त्यांना एक बेवारस व संशयास्पद स्थितीत अज्ञात बोट दृष्टीस पडली.
यावरून त्यांनी तत्काळ विजयदुर्ग पोलीस ठाण्याशी संपर्क करून संशयास्पद नौका किनारपट्टी भागात असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच विजयदुर्ग पोलीस निरीक्षक अनिल गंभीर व त्यांच्या सहकाऱ्यांनी समुद्र किनारी धाव घेतली. यानंतर त्यांनी रत्नागिरी कोस्टगार्ड विभागाशी संपर्क साधून ही माहिती दिली. सुरक्षेचे तेरा वाजविणाऱ्या या संशयास्पद बोटीबाबत माहिती मिळताच कोस्ट गार्ड कमांडर चिफ एस. एम. सिंह व त्यांचे सहकारी तसेच कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी विजय खरात यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन बोटीची पाहणी केली. मात्र, या बोटीमध्ये संशयास्पद कोणतीही वस्तू आढळून आली नाही.अष्टकोनी आकाराच्या बोटीवर टाकलेल्या कापडावर झोडॅक व मेड इन फ्रान्स असे लिहिलेले आढळले. मात्र, जहाजासोबत वापरात येणारी लाईफ बोट असल्याचे पोलिसांनी सांगितले.