संचारबंदीत विनाकारण बाहेर पडणे पडू शकते महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:06 AM2020-12-24T04:06:41+5:302020-12-24T04:06:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत विनाकारण बाहेर पडणाऱ्यांंना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदी, संचारबंदी जारी केली. प्रवासी वाहतुकीवर बंधने लादली. ही बंधने धुडकावणाऱ्यांसह आरोग्य विभागाने गृह किंवा संस्थात्मक अलगीकरणाबाबत दिलेल्या सूचना अमान्य करणारे, मास्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हे नोंदवण्यास सुरुवात केली आहे. जूनपासून अनलॉकचा टप्पा सुरू होताच, टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यात आले.
अशात कोरोना आटोक्यात येत असताना, ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवीन कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. या विषाणूची घातकता येणाऱ्या काही दिवसात कळेल. त्यामुळे राज्यात अधिकची सतर्कता बाळगत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यात दिलेल्या वेळेत सार्वजनिक ठिकाणी जमाव करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त इतरही कोणत्याच ठिकाणी व्यक्तींना एकत्र न जमण्याचे आदेश या कलमाअंतर्गत देण्यात आले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबईतील पब, क्लब, रेस्टॉरंट्सह चौपाट्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे.
--------------------