आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकांनी अभ्यासात नोंदविले मत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
भारतात रस्त्यांवर गाड्या चालवीत असताना होणाऱ्या अपघाताचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. वर्षाला जवळपास १.५ लाख रस्ते अपघात भारतात होत असून, लहान मुलांच्या त्यातील मृत्यूचे प्रमाण अंदाजे वर्षाला २९ इतके आहे. रस्त्यांची वाईट अवस्था, मार्गिकेची शिस्त न पाळणे आणि रहदारीच्या नियमांची, कायद्यांची होणारी पायमल्ली ही या रस्ते अपघातांच्या प्रमुख कारणांपैकी प्रमुख कारणे आहेत. याशिवाय परदेशांतील गाड्यांत असणारी ‘ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम’ (एडीएएस)या यंत्रणेचा भारतीय वाहन क्षेत्रातील अभाव यामुळे या रस्ते अपघातांवर नियंत्रण येत नसल्याचे निरीक्षण आयआयटी बॉम्बेतील संशोधकांनी नोंदविले आहे. दरम्यान, एडीएएस या सूचक यंत्रणेमुळे ऑटोमॅटिक ब्रेकिंग, अपघातांची सूचना, मार्गिकेमध्ये राहण्याची शिस्त या मार्गदर्शक सूचना वाहकाला मिळत राहतात आणि अपघातांचे प्रमाण कमी होते. यामुळे भारतीय वाहन क्षेत्रात या यंत्रणेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे निरीक्षण या आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकांनी आपल्या अभ्यासात नोंदविले आहे.
आयआयटी बॉम्बेतील सिव्हिल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ. ॲना चार्ली आणि प्रा. डॉ. टॉम मॅथ्यू यांनी रस्ते अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या कारणांचा अभ्यास करून एडीएएस यंत्रणेची अंमलबजावणी केल्यास भारतीय वाहतूक क्षेत्राला ती रस्ते अपघातापासून कशी वाचवू शकेल, यावर संशोधन केले आहे. त्यांचा हा अभ्यास नुकताच ‘जर्नल ट्रान्पोर्टटेशन लेटर्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पाश्चिमात्य देशांत वापरली जाणारी ‘एडीएएस’ प्रणाली थेट भारतीय बाजारपेठेत आणणे शक्य नाही, कारण ही प्रणाली तयार करताना गाडी चालविणाऱ्याची मानसिकता, याचबरोबर रस्त्यांची स्थिती, रस्त्यावरील दिशादर्शक खुणा, सूचना या सर्वांचा विचार करून ही प्रणाली आखण्यात आली असल्याचे डॉ. चार्ली यांनी आपल्या प्रबंधात स्पष्ट केले आहे. परदेशातील चालकांची मानसिकता आणि आपल्या देशातील चालकांची मानसिकता यात मोठा फरक आहे. भारतातील अपघात हे मोठ्या प्रमाणावर मार्गिकेची शिस्त मोडणे, बेदरकार वाहन चालविणे, यामुळे होतात, तर याउलट पाश्चिमात्य देशांत वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोर होते.
या संशोधनासाठी प्राध्यापिका चार्ली आणि मॅथ्यू यांनी ९४ किमी लांब असलेल्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतुकीचा अभ्यास केला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आजपर्यंत अनेक रस्ते अपघातांच्या घटना घडल्या असून, तेथील रस्तेही विविध प्रकारच्या वळणाचे असल्याने त्यांनी त्याची निवड केली. एक्स्प्रेस वे वर २३ विविध वाहनचालकांच्या वाहनांची पोझिशन, स्पीड, ऍक्सिलरेशन यांसारख्या विविध घटकांचा त्यांनी १८८ आणखी विविध विभागांत अभ्यास केला. उतरण असलेल्या ठिकाणी किंवा वळणांच्या ठिकाणी अधिक अपघातांचे प्रमाण निश्चित करण्यात आले, तसेच या दरम्यान वाहनचालक अनेकदा वाहनांचा स्पीड आणि मार्गिका बदलत असल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले.
या सगळ्या नोंदी, निरीक्षणे आणि अभ्यासावरून रात्रीच्या वेळी वाहनचालक सतत बदलत असलेले आपल्या वाहनाची गती हा असुरक्षित असतो. सोबतच दिवसा वाहन चालवताना अचानक मार्गिका बदलणे ही असुरक्षितच आहे. तीव्र उताराचे रस्ते अपघातांकडे नेणारे असल्याचे निरीक्षण या प्राध्यापकांनी आपल्या अभ्यासात नोंदविले आहे. हे प्राध्यापक आपल्या अभ्यासात अजून चांगले बदल, निरीक्षणे नोंदवित असून, आम्हाला अजून यात पाऊस, धुक्यातील दृश्यता अशा वातावरणीय बदलांचा वाहनचालकांवर कसा, काय परिणाम होतो, याचा अभ्यास अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया डॉ. चार्ली यांनी दिली. यूएनकडून वर्ष २०१० ते २०२० हे रोड सेफ्टीचे दशक म्हणून घोषित केले असून, भविष्यात सुरक्षित रस्ते आणि वाहने यांचीच अपेक्षा करून असे मत त्यांनी व्यक्त केले.
...... ...... ......
कोट
आम्ही केलेल्या अभ्यासातील माहिती ही भविष्यात नवीन रहदारीच्या सुविधा, नियम बनविण्यासाठी उपयोगी पडू शकते, जी इतर कोठेही सहज मिळणार नाही. असुरक्षित वाहन चालविणे आटोक्यात आणण्यासाठी आणि एडीएएससारखी प्रणाली विकसित करण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
-प्राध्यापक टॉम मॅथ्यू, आयआयटी बॉम्बे.