वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेर बिनधास्त करा पार्किंग; पश्चिम रेल्वे उपलब्ध करून देणार सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 11:33 AM2023-04-01T11:33:30+5:302023-04-01T11:33:42+5:30
पार्किंगच्या सुविधेमुळे नियंत्रित प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी आधुनिक पद्धतीची यांत्रिकीकृत बूम बॅरियर सिस्टीम प्रदान करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक वांद्रे टर्मिनस आहे. या ठिकाणी खासगी वाहनाने येणे म्हणजे मोठे दिव्यच. कारण, स्थानकाबाहेरील परिसराची रचना आणि सकाळी तसेच सायंकाळी प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी यामुळे वाहन पार्क करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. आता ही डोकेदुखी थांबणार आहे. कारण, पश्चिम रेल्वे पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पार्किंगच्या सुविधेमुळे नियंत्रित प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी आधुनिक पद्धतीची यांत्रिकीकृत बूम बॅरियर सिस्टीम प्रदान करण्यात आली आहे. स्थानक इमारतीजवळ प्रवाशांसाठी निश्चित ‘पिक अप’ आणि ‘ड्रॉप पॉइंट’ करण्यात आले आहेत. टॅक्सी, रिक्षा आणि खासगी वाहनांसाठी खास लेन निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहनांची ये - जा सुलभ होईल आणि स्टेशन परिसर गर्दीमुक्त होईल.
सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी दिली. दरम्यान, बांद्रा टर्मिनस रेल्वे स्थानकात प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. परिणामी, खासगी वाहनाने येणाऱ्या प्रवाशांची स्थानकात जाताना तसेच बाहेर पडल्यानंतर वाहनाकडे जाताना प्रचंड गैरसोय होते. परंतु, आता वाहने पार्कींगमध्ये उभी केली जातील, त्यामुळे गैरसोय टळणार आहे.
चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पार्किंग परिसरात चोवीस तास सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहे. रेल्वे प्रवाशांना आनंददायी अनुभव देण्यासाठी पश्चिम रेल्वे आपल्या स्थानकांवर प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. वांद्रे टर्मिनस स्थानकावरील या आधुनिक सुविधेमुळे प्रवाशांना सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळेल असे ही जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.
५ मिनिटांत परिसर सोडणाऱ्यांना शुल्क नाही
खासगी वाहनाने येणाऱ्यांना पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाईल. मात्र, पाच मिनिटांत परिसर सोडणाऱ्या खासगी वाहनांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, वाहनचालकांना वाहन पार्किंग करायचे असेल आणि अधिक काळ रेल्वे स्थानकात थांबावे लागणार असेल तर त्यांच्याकडून पार्किंग शुल्क आकारले जाणार आहे.