दीपक मोहिते, वसईचाळी, अनधिकृत बांधकामे व अनधिकृत गोदामांचा समावेश असलेल्या या प्रभागात गेल्या काही वर्षात प्रचंड बांधकामे करण्यात आली. यातील ६० ते ७० टक्के बांधकामे ही अनधिकृत असून त्याचा परिणाम नागरी सुविधा देणाऱ्या यंत्रणांवर झाला. कर न भरता सर्वांनाच नागरी सुविधा मिळत असल्याने प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या करदात्यांवर अन्याय होतो. या अनधिकृत बांधकामावर नियंत्रण आणणे स्थानिक नगरसेविकेला शक्य होऊ शकले नाही. काही प्रमाणात विकासकामे झाली परंतु त्याचे दृष्यपरिणाम काही पहावयास मिळत नाहीत.या प्रभागातील धानीव ते बिलालपाडा दरम्यानचा रस्ता पूर्णपणे खचला होता. अनेक तक्रारी होऊनही तो दिर्घकाळ दुरूस्त झाला नाही. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सध्या या रस्त्याची दुरूस्ती सुरू आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणे अत्यंत धोकादायक झाले होते. पावसाळ्यात तर या रस्त्यावर वाहनचालकांना जीव मुठीत धरून आपली वाहने चालवावी लागत असत. अनधिकृत बांधकामाविरोधात सर्वत्र धडक मोहिमा राबविण्यात आल्या परंतु या भागात मात्र हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच मोहिमा राबवल्या गेल्या. अनधिकृत बांधकामे करत असताना अनेक अपघातही झाले व त्यात मजुरांचा बळीही गेला. तरीही ती आजही सुरू आहेत. अनधिकृत बांधकामांत माफक दरात मिळत असलेल्या खोल्यांमुळे येथील लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ होत गेली. परंतु त्या प्रमाणात नागरीसुविधा मात्र उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पाणीटंचाई या प्रभागाच्या पाचवीला पुजली आहे. पूर्वा पाटील यांनी आपल्या कार्यकाळात काही विकासकामे केली. त्यामध्ये रस्ते व पाड्यापाड्यावर बोअरींग घेणे इ. विकासकामांचा समावेश आहे. अनधिकृत बांधकामे वाढली त्या अनुषंगाने लोकसंख्या वाढली परंतु महानगरपालिकेच्या महसूलात मात्र भर पडू शकली नाही. सतत वाढत असणाऱ्या या अनधिकृत बांधकामामुळे महानगरपालिकेला भविष्यात अनंत अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
प्रभागात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट
By admin | Published: January 29, 2015 10:56 PM