असंघटित कामगारांमध्ये शेतमजुरांचाही समावेश!
By admin | Published: July 22, 2015 01:05 AM2015-07-22T01:05:34+5:302015-07-22T01:05:34+5:30
राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्यासाठी येत्या ९ आॅगस्टपासून राज्यव्यापी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करण्यासाठी येत्या ९ आॅगस्टपासून राज्यव्यापी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी आज ही घोषणा केली. शेतमजुराचादेखील असंघटित कामगारांमध्ये समावेश करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे.
राज्यात असंघटित क्षेत्रात ५५ लाख कामगार आहेत. मात्र त्यातील केवळ २ लाखांच्या आसपासच कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या विसंगतीकडे लक्ष वेधत काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे असणारा ३ हजार ६५ कोटींचा निधी पडून आहे. या निधीचा लाभ जास्तीतजास्त कामगारांपर्यंत पोहोचावा यासाठी तातडीने जास्तीतजास्त कामगारांची नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना विजय वडेट्टीवार आदींनी मांडली होती. धानउत्पादक शेतमजुरांनाही असंघटित कामगार म्हणून मान्यता द्या, अशी मागणी त्यांनी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शशिकांत शिंदे, डॉ. सुनील देशमुख, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांनी जास्तीतजास्त कामगारांची नोंदणी करावी, अशी मागणी लावून धरली.
त्यावर इमारत व बांधकाम मंडळ तसेच घरेलू कामगार मंडळाकडे मिळून ७ लाख ७७ हजार १५३ कामगारांची नोंदणी झाली असून, उर्वरित नोंदणी ९ आॅगस्टपासून केली जाईल, असे मंत्र्यांनी सांगितले.