मोदींच्या काळात कृषीक्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी, पाशा पटेल यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 20:32 IST2019-03-28T20:12:37+5:302019-03-28T20:32:03+5:30
शेतमालाची निर्यात वाढवण्यासाठी ‘कृषी निर्यात धोरण’ तयार करणारे मोदी सरकार हे पहिले सरकार आहे. साखरेच्या विक्रीची किमान किंमत ठरविण्याचा अभूतपूर्व निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे देशातील साखर उद्योग वाचला असंही पाशा पटेल यांनी सांगितले.

मोदींच्या काळात कृषीक्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी, पाशा पटेल यांचा दावा
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शेतमालाला रास्त हमीभाव देण्यासोबत डाळी, तेल, उस, साखर अशा सर्व बाबतीत अभूतपुर्व कामगिरी केली आहे असा दावा राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी गुरूवारी मुंबईत केले. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना पाशा पटेल म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात देशभरातल्या अनेक शेतकरी संघटनांनी सरकारकडे हमीभावाची मागणी केली. मात्र, प्रत्येक वेळी सरकारने आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला करत अवहेलना केली. पण पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि ५० टक्के हमीभाव दिला. ज्या मागणीसाठी आजवर देशातला प्रत्येक शेतकरी झटत होता ती मागणी या सरकारच्या कार्यकाळात पुर्ण झाल्याचा आनंद आहे. शेतमालाची निर्यात वाढवण्यासाठी ‘कृषी निर्यात धोरण’ तयार करणारे मोदी सरकार हे पहिले सरकार आहे.
‘शेतीला वाईट दिवस आले आहेत’ या शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देताना पाशा पटेल म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात शेतीविषयक जे निर्णय घेतले गेले त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत होती. इथेनॉलचा शोध ब्राझीलमध्ये 1931 ला लागला ते इथेनॉल कसे तयार होते हे काँग्रेस सरकारला कळण्यासाठी 70 वर्ष लागली. वाजपेयी यांच्या सरकारने इथेनॉल निर्मितीस चालना दिली मात्र युपीए सरकारच्या काळात इथेनॉलचा विषय मागे पडला. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा इथेनॉल निर्मीतीला चालना दिली.
काँग्रेस सरकारने पाम तेलावरील आयात शुल्क खूप कमी केल्यामुळे भारतातील तेलबिया उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मोदी सरकारने मात्र पाम तेलावरील आयात शुल्क वाढविल्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना लाभ झाला. साखरेच्या विक्रीची किमान किंमत ठरविण्याचा अभूतपूर्व निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे देशातील साखर उद्योग वाचला असंही पाशा पटेल यांनी सांगितले.