लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मोबाइल चोरीच्या संशयातून झालेल्या वादात जिगर चावडा (२३) याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी कचरा वेचणाऱ्या दुकलीला अटक केली.
विलेपार्ले येथील पडक्या इमारतीत २२ जून रोजी जिगर चावडा (२३) याचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. आरोपींनी चावडाच्या डोक्यात लाकडी ठोकळ्याने तसेच दगडाने हल्ला करत, त्याचा मोबाइल घेऊन पळ काढला हाेता. याप्रकरणी तपास अधिकारी राजेंद्र काणे, शीव भोसले, पटेल, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे महाडेश्वर, चिपकर व त्यांच्या पथकाने ४० कचरा वेचणाऱ्यांकडे कसून चाैकशी केली. त्यावेळी दोघे बेपत्ता असल्याचे समोर आले. तपासादरम्यान जमील अहमद अन्सारी (४५) हा २४ जून रोजी पथकाच्या हाती लागला. त्यापाठोपाठ शनिवारी रितेश विलास मारू (३६) यालाही अटक करण्यात आली.
दोघेही कचरा वेचक असून, घटनेच्या दिवशी मोबाइल चोरीच्या संशयात चावडासोबत त्यांचा वाद झाला हाेता. चावडा अभिलेखावरील आरोपी हाेता. तो कचरा वेचकांचा कचरा घेऊन स्वतः पैसे खात होता. त्यामुळे त्याच्यावर या दाेघांचा राग होता. अन्सारी आणि मारूने त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस अधिक तपास करत आहेत.