महिनाभरापूर्वी झालेल्या हत्येमागील गूढ उकलले

By admin | Published: August 23, 2015 04:05 AM2015-08-23T04:05:44+5:302015-08-23T04:05:44+5:30

किरकोळ कारणावरून कुमोद झा (४५) या इसमाची हत्या करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटने बेड्या ठोकल्या. २७ जुलैला कुमोदचा मृत्यू झाला होता. मात्र चार दिवसांपूर्वी

Unraveling the mystery behind the murder that happened a month ago | महिनाभरापूर्वी झालेल्या हत्येमागील गूढ उकलले

महिनाभरापूर्वी झालेल्या हत्येमागील गूढ उकलले

Next

मुंबई : किरकोळ कारणावरून कुमोद झा (४५) या इसमाची हत्या करणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटने बेड्या ठोकल्या. २७ जुलैला कुमोदचा मृत्यू झाला होता. मात्र चार दिवसांपूर्वी बिहारमध्ये राहणाऱ्या आईने कुमोदच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करणारा ई-मेल पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना धाडला होता. मारियांनी या प्रकरणाचा तपास कांदिवली युनिटकडे सोपवला होता. हार्दिक विजय वझे (२५), जितेश राठोड ऊर्फ पप्पी (३२), अमित पटेल (२८) आणि विनोद जैन (२८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलैला कांदिवलीच्या मयूर सिनेमाजवळ असलेल्या समृद्धी बारमध्ये कुमोद त्याच्या मित्रासोबत दारू पिण्यासाठी आला होता. त्याच बारमध्ये आरोपीदेखील होते. रात्री दीडच्या सुमारास घरी जात असताना कुमोदचा धक्का चौघांपैकी एकाला लागला. त्यावरून वाद झाला. पुढे चौघांनी कुमोदला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. गंभीर जखमी झालेला कुमोद बेशुद्ध पडला. मित्राने त्याच अवस्थेत कुमोदला घरी सोडले. घडलेला प्रसंग त्याने कुमोदच्या पत्नीला सांगितला. बराच वेळ कुमोद शुद्धीवर येत नव्हता. त्यामुळे पत्नीने त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला होता. मात्र काही तांत्रिक गोष्टींमुळे कांदिवली पोलिसांचा तपास रेंगाळला. मृत्यूपूर्वी कुमोदला मारहाण झाल्याची बाब कुटुंबीयांना ठाऊक होती. मात्र असे असूनही पोलीस काहीच हालचाल करत नसल्याने बिहारमध्ये राहणारी आई निर्मलादेवी यांनी पोलीस आयुक्तांना ई-मेल धाडून संशय व्यक्त केला. तेव्हा आयुक्त मारिया यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या कांदिवली युनिटला दिले.
युनिटचे प्रमुख चिमाजी आढाव व पथकाने प्रथम कुमोदच्या पत्नी व मित्राचे जबाब नोंदवून आदल्या दिवशी घडलेल्या घटनेची माहिती घेतली. पुढे समृद्धी बारमध्ये चौकशी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजही मिळवले. त्यात मारहाण करणाऱ्या आरोपींना कुमोदच्या मित्रांनी ओळखले.

Web Title: Unraveling the mystery behind the murder that happened a month ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.