किल्ले रायगडाचे दर्शन घडवणारी अपरिचित गुहा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 01:10 PM2023-04-28T13:10:29+5:302023-04-28T13:10:53+5:30

दुर्गवीरांच्या परिश्रमाला यश

Unrecognized cave overlooking Raigad fort | किल्ले रायगडाचे दर्शन घडवणारी अपरिचित गुहा

किल्ले रायगडाचे दर्शन घडवणारी अपरिचित गुहा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : पन्हाळेदुर्गवर एका नवीन गुहेचा शोध लागला आहे. या गडावर एक अपरिचित गुहा असल्याची चर्चा वाडवडील सांगायचे. मात्र या गुहेचे अवशेष अथवा पुरावे सापडत नव्हते. मात्र ही गुहा शोधून काढण्याचे काम स्वप्निल खाडे, दिपेश सुतार, तेजस कदम, शेखर खडपे या दुर्गवीरांनी 
केले आहे.
२ एप्रिल २०२३ ला ‘मावळा स्वराज्याचा’ प्रतिष्ठानतर्फे पन्हाळेदुर्गवर मोहीम आयोजित केली होती. त्यावेळी अक्षय खोत यांनी ड्रोनद्वारे पन्हाळे दुर्गचे छायाचित्रण केले होते. त्यातील एका छायाचित्रामध्ये गुहा दिसत होती. त्यानंतर ‘काहीही करून या गुहेला शोधून काढायची, असा त्यांनी निर्धारच केला. त्यानंतर १९ एप्रिलला ही गुहा ड्रोन व केतन फुलपगारे, विनायक जाधव, दिपेश सुतार, तेजस कदम, अक्षय खोत, शेखर खडपे यांच्या अथक प्रयत्नाने शोधून काढली.

महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर विविध आकारांच्या गुहा, लेणी पाहायला मिळतात. पन्हाळे दुर्गवरदेखील अशी गुहा असल्याची चर्चा होती. त्या गुहेचा शोध घेण्याचा सर्वप्रथम प्रयत्न १८ डिसेंबर २०२२ रोजी दिपेश सुतार आणि स्वप्निल खाडे यांनी केला. यावेळी त्यांनी पन्हाळघर आदिवासी वाडी-पन्हाळेदुर्ग गडमाथा-खडकोली गावाच्या दिशेने असलेल्या पन्हाळदुर्गच्या बाजूची त्यांनी पाहणी केली. मात्र त्यांना त्यावेळी यश आले नाही. त्यानंतर २६ मार्चला दिपेश सुतार, तेजस कदम, शेखर खडपे आणि स्वप्निल खाडे यांनी पुन्हा नव्याने शोधमोहिमेला सुरुवात केली. त्यावेळी पन्हाळेदुर्गच्या परिसरात काही घडीव पाषाण नजरेस आले. त्यावेळी पन्हाळघर बुद्रुक (मूळगाव) च्या दिशेने असलेला पन्हाळे दुर्गचा बराचसा कातळ असलेला भाग अगदी पिंजून काढला होता. मात्र पुन्हा अपयश पदरी आले.  

 छत्रपती शिवाजी महाराजांनी 
रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर, युद्धशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्यांची साखळी तयार केली. 

 मानगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची निर्मिती केली. तर काही जुने गड मजबूत केले. याच किल्ले रायगडाच्या परिसरात पन्हाळघर नावाचे दुर्ग आहे. 

 याचा किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे रायगडाला जाण्याच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी टेहाळणीसाठी केला जात असे. आता याच गडावर एक अपरिचित गुहा सापडली आहे.

Web Title: Unrecognized cave overlooking Raigad fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.