लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नामांकित महाविद्यालयात अकरावीचे वर्ग झाले असून काही महाविद्यालयात या आठवड्यात सुरु होणार आहेत. पण, अजूनही हजारो विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळालेला नाही. शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी चार याद्या लावण्यात येणार, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे प्रवेश न घेतलेल्या अथवा प्रवेश न मिळालेल्या हजारो विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. १० आॅगस्टला पुन्हा प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यानंतर १२ आॅगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करुन १४ आॅगस्टला पाचवी यादी जाहीर होऊ शकते. याबद्दलची माहिती अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.मुंबई विभागात अकरावी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने राबविली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. अकरावी प्रवेशाच्या चारही याद्या आॅनलाईन जाहीर करण्यात आल्या. चारही याद्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले. पण, महाविद्यालय लांब आहे, महाविद्यालयात हवे ते विषय नाहीत, मित्र - मैत्रिणी महाविद्यालयात नाहीत अशा कारणांमुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आणि प्रवेश घेतला नाही, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाद करण्यात आले. त्यामुळे पुढच्या यादीत विद्यार्थ्यांचे नाव लागले नाही. तर, काही विद्यार्थ्यांचे गुण कमी असूनही महाविद्यालयांचा पसंतीक्रम चुकीचा भरला गेला. त्यामुळेही विद्यार्थ्यांची नावे यादीत लागलेली नाहीत.जवळपास १२ ते १४ हजार विद्यार्थ्यांना अजूनही अकरावीत प्रवेश मिळालेला नाही. यामुळे विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आता अकरावीत प्रवेश न मिळाल्याने अनेक पालक-विद्यार्थी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली आहे.आज प्रवेशाचाशेवटचा दिवसअकरावी प्रवेशाच्या चौथ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी ९ आॅगस्टला दुपारी २ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यानंतर किती जणांनी प्रवेश घेतले नाही घेतले याची छाननी केली जाणार आहे.गुरुवारीही अकरावीच्या प्रवेशाची संधीअकरावीच्या चौथ्या यादीत नाव लागलेल्या विद्यार्थ्यांना बुधवार, ९ आॅगस्टला दुपारी २ वाजेपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत होती. पण, बुधवारी मराठा क्रांती मोर्चा असल्याने गुरुवारपर्यंत घेण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रवेश न मिळालेले विद्यार्थी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 6:53 AM