Join us

विनापरवाना औषधविक्री

By admin | Published: August 09, 2016 2:41 AM

विनापरवाना औषधांची साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणी अंधेरी येथील डॉक्टर जोशीज मॅटर्निटी अ‍ॅण्ड सर्जिकल रुग्णालयाविरुद्ध एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे

मुंबई : विनापरवाना औषधांची साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणी अंधेरी येथील डॉक्टर जोशीज मॅटर्निटी अ‍ॅण्ड सर्जिकल रुग्णालयाविरुद्ध एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे. या रुग्णालयातून तब्बल ३ लाख रुपयांची औषधे हस्तगत करण्यात आली आहेत. लवकरच संबंधितांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवर असणाऱ्या डॉक्टर जोशीज मॅटर्निटी अ‍ॅण्ड सर्जिकल रुग्णालयात विनापरवाना औषधांची साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती महापालिकेला मिळाली होती. याची पडताळणी करण्यासाठी औषध निरीक्षक अ. स. गोडसे आणि एल. डी. पिंटो यांनी शनिवारी रुग्णालयाला भेट दिली. या वेळी डॉ. दीप्ती जोशी यांना पिंटो यांनी रुग्ण म्हणून भेट दिली. या वेळी डॉक्टरांनी संबंधितांना औषधासाठीची चिठ्ठी लिहून दिली. शिवाय औषध घेण्यासाठी तळमजल्यावर जाण्यास सांगितले. याप्रसंगी रुग्णालयाच्या तळमजल्यावर डॉ. शरद जोशी आणि डॉ. दीप्ती जोशी यांनी लिहून दिलेल्या औषधांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. या औषधांच्या परवान्याची मागणी करता औषधांचे कोणतेही परवाने मंजूर नसल्याचेही आढळले.येथून तब्बल ३ लाख रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्यातून दोन औषधांचे नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून संबंधितांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली. ही कार्यवाही अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, सहआयुक्त (दक्षता) हरीश बैजल व सहआयुक्त (बृहन्मुंबई) बा. रे. मासळ आणि साहाय्यक आयुक्त प्र.ब. मुंधडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. (प्रतिनिधी)