विनातिकीट प्रवाशांनो, लोकलमध्ये फिरतेय तिकीट तपासनिसांचे पथक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 06:36 AM2019-10-17T06:36:43+5:302019-10-17T06:37:16+5:30
मागील सहा महिन्यांत मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर या विभागातून फुकट्या प्रवाशांकडून १०० कोटी रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे.
मुंबई : रेल्वे स्थानकावरील तिकीट तपासनिसांची (टीसी) नजर चुकवून लोकल प्रवास करणाऱ्या विनातिकीट प्रवाशांचा प्रवास अवघड होणार आहे. कारण मध्य रेल्वे मार्गावरील धावत्या लोकलमध्ये एखादा तिकीट तपासनीस नव्हे, तर तिकीट तपासनिसांचे पथकच फिरत आहे.
मागील सहा महिन्यांत मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर या विभागातून फुकट्या प्रवाशांकडून १०० कोटी रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी फुकट्यांची संख्या वाढली आहे. त्यांना रोखण्यासाठी लोकलमध्ये तिकीट तपासनिसांसह रेल्वे सुरक्षा बलाचे जवानही असतील. याआधी जास्त करून प्रथम श्रेणीच्या डब्यातील प्रवाशांच्याच तिकिटांची तपासणी होत असे. परंतु आता या पथकाद्वारे प्रथम श्रेणीसह, द्वितीय श्रेणी, महिला, मालडबा, दिव्यांगांच्या डब्यातीलही प्रवाशांच्याही तिकिटांची तपासणी होत आहे. तिकीट नसल्यास दंडात्मक कारवाईही केली जात आहे.
प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा
रेल्वे स्थानकासह लोकलमध्येही आता तिकीट तपासनिसांचे पथक तपासणी करत आहे. लोकलमध्ील विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंडवसुली करत आहेत. त्यामुळे फुकट्या प्रवाशांची संख्या कमी होईल. रेल्वे प्रवास करताना प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा. किंबहुना, कुणीही विनातिकीट प्रवास करू नये, यासाठीच ही मोहीम राबविण्यात येत आहे.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.