पोलिसांना चिंता शिवसेनेतील असंतोषाची
By admin | Published: April 9, 2015 04:56 AM2015-04-09T04:56:05+5:302015-04-09T04:56:05+5:30
जागा वाटपात शिवसेनेच्या अनेक हक्काच्या जागा भाजपाच्या वाट्याला गेल्याने व उरलेल्या जागांवर आयारामांसह नेत्यांच्या नातेवाइकांना प्राधान्य देण्यात आल्याने
नारायण जाधव, नवी मुंबई
जागा वाटपात शिवसेनेच्या अनेक हक्काच्या जागा भाजपाच्या वाट्याला गेल्याने व उरलेल्या जागांवर आयारामांसह नेत्यांच्या नातेवाइकांना प्राधान्य देण्यात आल्याने शिवसेनेत पसरलेला असंतोष अद्याप शमलेला नाही. उलट बंडखोरांनी नामांकन अर्ज भरल्यानंतर त्यातील धग अधिक वाढली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीत काही ठिकाणी संघर्ष होऊ शकतो, असा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता, मात्र आता त्यांना खरी चिंता शिवसेनेतील अंतर्गत असंतोषाची आहे. त्यातच अनेक भागांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना शिवसैनिकांचा राग बघून पक्षाचे उपनेते असलेले विजय नाहटा यांना त्यांच्या प्रचारापासून चार हात लांब ठेवावेसे वाटत आहे. याबाबत त्यांनी आपल्या स्थानिक श्रेष्ठींना ‘विजय नाहटा नको रे बाबा...’ असे कळविले असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
६ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ७ एप्रिलपर्यंत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांनी विजय नाहटांसह पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धार केला. शिवसेनेच्या वाट्याला ६८ जागा असल्या तरी पक्षाच्या नेत्यांनी १३ जागांवर काँगे्रसशी समझोता केल्याची चर्चा होती. हे कमी म्हणून की काय उर्वरित जागांवर आयारामांना १२ ते १५ तर नगरसेवकांच्या नातेवाइकांना २५-३० च्या आसपास तिकिटे दिल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. यामुळे पक्षासाठी झटणाऱ्या शिवसैनिकांना केवळ १५ ते २० ठिकाणी उमेदवारी मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.