Join us

मुंबई ठरतेय महिला आणि मुलांसाठी असुरक्षित

By admin | Published: November 15, 2016 5:10 AM

देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरी महिला आणि मुलांसाठी दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालली आहे. शहरातील ३३ टक्के महिलांना असुरक्षित

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबापुरी महिला आणि मुलांसाठी दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालली आहे. शहरातील ३३ टक्के महिलांना असुरक्षित वाटत असून, गेल्या पाच वर्षांमध्ये महिलांवरील बलात्काराच्या गुन्ह्यात तब्बल २८९ टक्के, तर विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये २८७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये लहान मुलांवर लैंगिक अत्याचारासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचले असल्याची धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशन या समाजसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.मुंबईतील गुन्हेगारी, गुन्ह्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, आरोपींना न्यायालयाने दिलेली शिक्षा, मुंबई पोलीस दलाची क्षमता आणि मर्यादा तसेच मुंबईकरांना किती सुरक्षित वाटते, मुंबईतील लोकप्रतिनिधी वाढत्या गुन्हेगारीसंदर्भात किती जागरूक आहेत याबाबत प्रजा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून दरवर्षी सर्वेक्षण करण्यात येते. गेल्या आर्थिक वर्षाच्या सर्वेक्षणाचा अहवाल प्रजा फाउंडेशनतर्फे सोमवारी प्रेस क्लबमधील पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. या वेळी प्रजा फाउंडेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त नीताई मेहता तसेच प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी माहिती दिली.शहरात राहणाऱ्या महिला आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यात लहान मुलांवर होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे मुंबईतील महिला आणि मुले असुरक्षित आहेत, असे ३३ टक्के लोकांना वाटत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ११ टक्क्यांनी वाढले आहे. यात दाखल झालेल्या ७२८ बलात्काराच्या गुन्ह्यांत १३ टक्के, विनयभंगाच्या २१४५ गुन्ह्यांमध्ये २८ टक्के आणि दंगलीच्या एकूण ४५२ गुन्ह्यांत २८ टक्के प्रमाण वाढले आहे. महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी आरोपींविरोधात कठोर पावले उचलण्यासोबतच शाळा, कॉलेज आणि पालकवर्गामध्येही पोलिसांकडून जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मेहता यांनी या वेळी सांगितले.मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदार यांच्या भरतीमध्ये आजच्या घडीलाही ७ टक्के तफावत म्हणजे तुटवडा असून, गुन्ह्यांची उकल करणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण अधिकाऱ्यांमध्ये हा तुटवडा ११ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातही तब्बल ५७ टक्के कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. असे असले तरी गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीच्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे.बलात्कार, हत्या, विनयभंग, अपहरण अशा दुय्यम गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या ९ टक्क्यांवरून वाढून १८ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर एकूण गुन्ह्यांतील दोषसिद्धीचे प्रमाण ३३ टक्क्यांवरून वाढून ४४ टक्के झाले आहे. असे असले तरी गुन्हा घडल्यापासून ते गुन्हा दाखल होणे, त्याचा तपास, जाब-जबाब, पुरावे गोळा करणे, सुनावणी या प्रक्रियेला विलंब होत आहे.