मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी मध्यरात्री २ वाजता काही क्षणांसाठी हलक्या पावसाचा मारा झाला. त्यानंतर पुन्हा गुरुवारी पहाटे बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. गुरुवारी सकाळी हवामान ढगाळ होते. दुपारी किंचित ढगांची गर्दी कमी झाली होती. सायंकाळी पुन्हा ढगांनी बऱ्यापैकी गर्दी केली. दुपारी आणि सायंकाळी पाऊस नसला तरी उकाडा प्रचंड होता.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्याच्या काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २८ मे रोजी कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.