Join us

अवकाळी पावसामुळे मच्छिमारांना मोठा फटका, नुकसान भरपाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 4:47 PM

Mumbai : गेल्यावर्षी सुरुवातीच्या हंगामात आलेल्या लागोपाठ दोन तीन चक्रीवादळे आणि गेल्या मे महिन्यामध्ये आलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छिमार हवालदिल झाला होता.

मुंबई - आज सकाळपासून अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. मुंबईतील मच्छिमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावर वळविल्या. त्याआधी मच्छिमारांनी पकडून आणलेली मासळी, जी सुकविण्याकरिता दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. बांबूवर वाळविण्यासाठी मासळी ठेवलेली होती. ती सर्व मासळी ओली होऊन खराब झाली आहे. मच्छीमारांचे यात हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शासनाने प्रत्येक मच्छिमार गावांमध्ये जाऊन तिथे आपल्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करून मच्छिमारांचे झालेले नुकसान याचा अहवाल तयार करावा. तसेच, मच्छिमारांना त्यांच्या मासळीचे व इंधनाचे जे नुकसान झालेले आहे, त्याबद्दल नुकसान भरपाई मच्छीमार बांधवांना द्यावी, अशी विनंती भारतीय मच्छिमार काँग्रेसचे सरचिटणीस संतोष कोळी व मुंबई मच्छीमार काँग्रेसचे अध्यक्ष धनाजी कोळी यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना केली आहे. 

गेल्यावर्षी सुरुवातीच्या हंगामात आलेल्या लागोपाठ दोन तीन चक्रीवादळे आणि गेल्या मे महिन्यामध्ये आलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे मच्छिमार हवालदिल झाला होता. मोठ्या प्रमाणात मच्छिमारांच्या नौका बुडाल्या काही नौकांचे नुकसान झाले. त्यानंतर यंदा ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा मासेमारीचा हंगाम चालू झाला. मच्छिमार स्वतःला सावरत असताना पुन्हा अवकाळी पावसाचे आज आगमन झाल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती संतोष कोळी व धनाजी कोळी यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :मच्छीमारमुंबई