- मनीषा म्हात्रेमुंबई : चित्रपटाच्या बनावट प्रसारण परवानगी प्रमाणपत्राच्या आधारे चित्रपट थेट आॅनस्क्रीन येत असल्याची धक्कादायक माहिती एमआयडीसी पोलिसांकडे आलेल्या तक्रारीतून उघड झाली. ‘सेंट मेरी मराठी मीडियम’ या मराठी चित्रपटाच्या बाबतीत हा प्रकार घडला. या प्रकरणी चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश जाधव व प्रोडक्शन कंपनी मेसर्स शारदाश्री फिल्मस्विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चित्रपटावरही बंदी घालण्यात आली आहे.कुठलाही चित्रपट तयार करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक असते. त्यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर त्याचे चित्रीकरण होते. चित्रीकरणानंतर संपूर्ण सिनेमा तयार झाला की, सेन्सॉर बोर्डाकडे पुढच्या परवानगीसाठी जातो. तेथून ग्रीन सिग्नल मिळताच तो आॅनस्क्रीन येतो.मात्र सध्या काही दलाल संबंधित संस्थांचे बनावट परवानगी पत्र तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. २९ जून रोजी ^‘सेंट मेरी मराठी मीडियम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटाबाबत चित्रपट महामंडळ अनभिज्ञ होते. त्यांनी याबाबत सखोल चौकशी केली. तेव्हा, तपासात चित्रपट दिग्दर्शक जाधव यांनी चित्रपटगृहांना सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. त्यांनी तत्काळ चित्रपटावर बंदी घातली.चित्रपट मंडळाचे अधिकारी कमलाकर कांबळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपासात गोराईचा रहिवासी असलेला प्रदीप महाडिक याच्याकडे जाधव यांनी प्रमाणपत्र मिळविण्याची जबाबदारी सोपविली होती. त्यानेच हे चित्रपटाचे प्रसारण परवानगी प्रमाणपत्र बनावट तयार करून त्यावर शासनाचा शिक्कामोर्तब केला आणि ते प्रमाणपत्र खरे असल्याचे भासवून ते चित्रपटगृहांना संगणकीय माध्यमातून पाठविले. चित्रपट मंडळाची कोणतीही परवानगी न घेता तो प्रसारित केला, असे जाधव यांच्याकडून समजल्याचे कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.त्याने अशा प्रकारे यापूर्वीही बनावट प्रमाणपत्र दिले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी दिली.
विनापरवाना चित्रपट थेट आॅनस्क्रीन, अनेक बडे दिग्दर्शक अडकण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 4:55 AM