अखेरच्या क्षणापर्यंत प्लॅस्टिक विक्री सुरूच, विक्रेत्यांचा धंदा बसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 05:25 AM2018-06-23T05:25:31+5:302018-06-23T05:25:33+5:30
प्लॅस्टिक वापराची मुदत शुक्रवारी संपली असून रविवारपासून मुंबईत मनपा प्रशासन प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे.
- चेतन ननावरे
मुंबई : प्लॅस्टिक वापराची मुदत शुक्रवारी संपली असून रविवारपासून मुंबईत मनपा प्रशासन प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. बंदीच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी लाकडी ताट, वाट्यांसह कागदी चमचे आणि ग्लास, तसेच कापडी पिशव्या दुकानात विक्रीसाठी तयार ठेवल्या आहेत. मात्र प्लॅस्टिकच्या प्रतिबंधित वस्तूंवर रविवारपासून कारवाई होणार असल्याने शनिवारीही विक्री सुरू ठेवण्यासाठी शुक्रवारीही संबंधित दुकानांत प्रतिबंधित प्लॅस्टिक वस्तूंचा भरणा दिसला.
मशीद बंदर, नळबाजार, कुर्ला, दादर अशा बाजारपेठांच्या परिसरात प्लॅस्टिक व थर्माकोलचे ताट, वाट्या, चमचे, ग्लास आणि इतर उत्पादने मोठ्या संख्येने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रविवारपासून मनपा प्रशासन प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरणाºयांविरोधात दंडात्मक कारवाईस सुरुवात करणार आहे. मात्र कारवाई रविवारपासून सुरू होणार असल्याने शिल्लक असलेला माल खपवण्यासाठी दुकानदारांमध्ये चढाओढ लागली आहे. बंदीच्या निर्णयामुळे गेल्या १५ दिवसांपासून दुकानदारांचा धंदा बसल्याची प्रतिक्रिया शादमान कुरेशी या विक्रेत्याने व्यक्त केली. लाकडी आणि कागदी उत्पादने महाग असल्याने ग्राहकांकडून अद्याप म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. याउलट प्लॅस्टिक व थर्माकोलची उत्पादने खरेदी करण्यास नागरिक धजावत नाहीत. बहुतेक नागरिकांना शनिवारपासून कारवाई होणार असल्याचे वाटत असल्याने कार्यक्रम असूनही भीतीपोटी ते वस्तूंकडे पाठ फिरवत आहेत.
नळबाजारातील विक्रेता अजीम सय्यद याने सांगितले की, दुकानात अद्याप ४० टक्के माल हा प्लॅस्टिक व थर्माकोलचा असून सुमारे ६० टक्के माल हा प्लॅस्टिकला पर्याय असलेल्या लाकूड, कापड आणि कागदापासून तयार केलेला आहे. अद्याप शनिवारचा दिवस विक्रीसाठी आणि वापरासाठी असल्याने उरलेला माल विक्रीसाठी ठेवल्याचे त्याने आवर्जून सांगितले. किमान काही तासांमध्ये होणाºया विक्रीमुळे काही प्रमाणात तरी नुकसान कमी होण्याची शक्यता विक्रेत्यांना वाटत असल्याचे अजीमचे म्हणणे होते.
>पर्यायी उत्पादनांनी सजली बाजारपेठ
लग्न समारंभापासून पूजा, वाढदिवस आणि अन्य प्रसंगांमध्ये अल्पोपहार किंवा जेवणासाठी वापरण्यात येणाºया प्लॅस्टिक व थर्माकोलच्या डिश, ताट, वाटी, चमचे, ग्लास अशा विविध वस्तूंना पर्यायी वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेषत: या वस्तू लाकूड, कापड आणि कागदापासून तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यात कापडाच्या पिशव्यांसह लाकडाचे ताट, वाट्या, चमचे यांचा समावेश आहे. तर कागदी डिश, ग्लास यांच्यासह अॅल्युमिनियम फॉइलपासून तयार केलेल्या जेवणाच्या कंटेनरचा समावेश आहे.
पर्याय दुप्पट महागडा!
प्लॅस्टिक व थर्माकोलला पर्याय असलेल्या लाकूड, कागद आणि कापडी वस्तूंच्या किमती प्रतिबंधित वस्तूंच्या तुलनेने तब्बल दुपटीने महाग असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे पर्याय उपलब्ध असला, तरी तो अंगीकारण्यासाठी काही काळ विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागेल, अशा प्रतिक्रिया विक्रेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.