Join us

३ मेपर्यंत एक्सप्रेस, लोकल बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 6:08 PM

पुढील २० दिवस फक्त मालगाडी धावणार

मुंबई : कोरोनाशी सामना करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात ३ मेपर्यंत म्हणजे आणखीन २० दिवस लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. त्यानंतर तत्काळ रेल्वे मंत्रालयाने देशातील प्रीमियम गाड्या, मेल / एक्स्प्रेस गाड्या,प्रवासी गाड्या, उपनगरी लोकल,  कोलकाटा मेट्रो रेल, कोकण रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील २० दिवसात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी फक्त मालगाड्या धावतील.  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्चपासून २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. हा कालावधी १४ एप्रिल रोजी संपला. मात्र या काळात कोरोनाग्रस्त रुग्णाची संख्या वाढली गेली. त्यामुळे हि संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता पुन्हा २० दिवसांचा लॉकडाऊन वाढवला आहे. परिणामी, देशातील सर्व रेल्वे या ३ मेपर्यंत बंद ठेवण्यात येतील, अशी घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. देशाच्या विविध भागात आवश्यक पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी वस्तू आणि पार्सल गाड्यांची वाहतूक कायम राहणार आहे.  या कालावधीमध्ये भाजीपाला, दूध, पेट्रोल, डिझेल यासारख्या अत्यावश्यक बाबींची वाहून नेणाऱ्या मालगाड्यांची वाहतूक मात्र, सुरु राहणार आहे. अनारक्षित आणि प्रवासी आरक्षण केंद्रातील सर्व तिकिट काउंटर पुढील आदेश येईपर्यंत बुकिंगसाठी बंद राहतील. पुढील आदेशांपर्यंत ई-तिकिटांसह गाड्यांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण होणार नाही. तथापि, ऑनलाइन रद्द करण्याची सुविधा कार्यरत राहील. पुढील आदेश येईपर्यंत ३ मे नंतरच्या ई तिकिटांसह कोणत्याही प्रकारची बुकिंग केली जाणार नाही. रद्द केलेल्या गाड्यांच्या आरक्षणाचा संपूर्ण परतावा मिळेल. अद्याप रद्द न झालेल्या गाड्यांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण रद्द करणा-यांना देखील पूर्ण परतावा मिळेल. ३ मे २०२० पर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्यांच्या ऑनलाइन तिकीटांचा परतावा रेल्वेमार्फत ग्राहकांना ऑनलाईन स्वयंचलितपणे पाठविला जाईल. ज्यांनी काउंटरवर तिकीट बुक केले आहेत, ते ३१ जुलै २०२० पर्यंत परतावा मिळवू शकतील.

टॅग्स :रेल्वेकोरोना वायरस बातम्या