मुंबई - दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. यातच शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी एक मोठा दावा केला आहे. शिंदे गटाच्या होणाऱ्या दसरा मेळाव्यात बीकेसीत शिवसेनेतील ५ आमदार आणि २ खासदार शिंदे गटात प्रवेश करतील, असे कृपाल तुमाने यांनी म्हटले आहे. तर, आमदार संतोष बांगर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच, या सर्वांची नावे आत्ताच सांगणार नसून तुम्ही स्टेजवरच पाहा, असेही बांगर यांनी म्हटले.
हिंगोलीतून मोठ्या प्रमाणात समर्थक, कार्यकर्ते मुंबईतील बीकेसी मैदानावर आले आहेत. हिंगोलीतून २०० बसेस आणि २०० चारचाकी गाड्या बीकेसी मैदानावर आल्या आहेत. मी हिंगोलीतून Dj आणला असून तो डिजे बीकेसीतील स्टेजसमोरच लावणार आहे, त्यासाठी सकाळपासूनच मी मैदानावर असल्याचं आमदार संतोष बांगर यांनी सांगितले. एकनाथ शिंदेंच्या हिंगोलीतील रॅलीपेक्षाही वेगळा डिजे येथे लावण्यात आला आहे. मुंबईत आजपर्यंत असा डिजे वाजला, तसा डिजे इथे वाजणार आहे.
आजच्या मेळाव्यात २ खासदार, ५ आमदार, नेते आणि उपनेतेही शिवसेनेत येणार आहेत. सध्या शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. आता, जर या नेत्यांची नाव जाहीर केली तर त्यांना थांबविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे, कोण कोण येणार आहेत, ते तुम्हाला संध्याकाळी स्टेजवरच दिसून येईल, असेही संतोष बांगर यांनी सांगितले.
शिवसेनेचे ५ आमदार २ खासदार येणार
कृपाल तुमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, याआधी बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुंबईत जायचो. पण आता बीकेसीमध्ये भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येतील. शिवसेनेचे ५० आमदार आणि १२ खासदार आमच्यासोबत आहेत. आता दोन खासदार, पाच आमदारांचा बीकेसीच्या मैदानावर प्रवेश झालेला दिसेल. शिंदेसोबत आहे तीच खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेला सदैव शिव्या देणाऱ्यासोबत आम्ही गेलेलो नाही, या शब्दांत निशाणा साधत, राज्यात खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची युती झाली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याला गतिमान सरकार मिळाले आहे, असे तुमाने म्हणाले.