मुंबई- मुंबईकरांना आता बस, लोकल आणि मेट्रोसाठी वेगवेगळे कार्ड काढण्याची आवश्यकता नाही. कारण आता तिन्ही वाहतुकींसाठी एकच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएससी कार्ड) जारी करण्यात आलं आहे. याचेच लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, मुंबई महानगर पालिकेचे प्रशासक आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोरोनाबाबतही सावध राहण्याचे आवाहन केले. मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायाला मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मास्क घालण्याचेही आवाहन केले.
मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मास्क काढत नाहीत तोपर्यंत तुम्ही मास्क काढू नका. मागे बोललो आहे ते परत एकदा बोलतो, मास्कसक्ती जरी नसली तरी मास्कमुक्ती झालेली नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींवरुन उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. जर कोणाला हनुमान चालिसा वाचायची असेल तर घरी येऊन वाचा, त्याचीही एक पद्धत असते. दादागीरी करून येऊ नका, बाळासाहेबांनी ही दादागिरी कशी मोडायची हे शिकविले आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
दरम्यान, शिवसेनेने हिंदुत्व सोडले, हे सांगितले जाते. ते काय धोतर आहे का?आमचे घंटाधारी नाही तर गदाधारी हिंदुत्व आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी काय केले? बाबरी पाडली तेव्हा कुठे बसलेले? राम मंदीर बांधण्याचे म्हणताय तर तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे, तुमचा नाही, तुम्ही तर ते बांधण्यासाठी हात पसरले, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली.