... तोपर्यंत पीओपीवरील बंदीला स्थगिती - आशिष शेलार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:13 AM2021-01-13T04:13:55+5:302021-01-13T04:13:55+5:30
अभ्यासगट स्थापन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या वापराने पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन ...
अभ्यासगट स्थापन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या वापराने पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आला आहे . या समितीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्याचे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना दिले. त्यामुळे माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नसेल, अशी माहिती भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली.
शेलार यांनी पीओपीच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुन्हा एकदा पर्यावरण मंत्री जावडेकर यांची भेट घेतली. महाराष्ट्रात माघी गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे, त्यामुळे याबाबत तोडगा काढावा, अशी विनंती त्यांनी जावडेकर यांना केली. त्यानंतर, या संदर्भात स्थापन अभ्यासगटाचा अहवाल येईपर्यंत बंदीला स्थगिती देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिल्याचे शेलार यांनी सांगितले.
पीओपीवरील बंदीमुळे गणेश आणि दुर्गा मूर्तिकार अडचणीत आले आहेत. या उद्योगावर पाच लाख रोजगार अवलंबून आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी शेलार यांच्यासह मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी मुंबईत जावडेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी अभ्यासगट स्थापन करण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार केंद्रीय पर्यावरण विभागाने दिल्ली आयआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्रमुख प्रा. के. के. पंत, प्रो. सी बालोममुमदार यांच्यासह पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या डाॅ. शुभांगी उंबरकर, डाॅ. मोहन डोंगरे यांच्यासह वॉटर क्वालिटी मॅनेजमेंट विभागाचे सेक्रेटरी जे. चंद्राबाबू यांची समिती स्थापन केली आहे.
.....................