मुंबई : लैंगिक शोषण करण्याच्या हेतूनेच गुन्हा केला आहे, हे सिद्ध होत नाही तोपर्यंत पॉक्सोअंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवू शकत नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने पुण्यातील एका रहिवाशाचा जामीन मंजूर करताना नोंदविले. एका अल्पवयीन मुलीचे कपडे फाडून तिला मारहाण करताना अयोग्यपणे स्पर्श केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
आरोपीवर नोंदविलेल्या गुन्ह्यावरून त्याने हे कृत्य मुलीचे लैंगिक शोषण करण्याच्या हेतूने केल्याचे दिसत नाही, असे निरीक्षण न्या. भारती डांगरे यांनी नोंदविले.
मुलीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये दुकानावरून वाद आहे. त्यावरून त्यांनी एकमेकांना कायदेशीर नोटीसही बजावल्या. आरोपी त्याच्या पत्नीसह अन्य दोन जणांबरोबर तक्रारदार मुलीच्या घरी आला आणि तिच्या पालकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपीने तिला व तिच्या १७ वर्षांच्या बहिणीला मारहाण केली. त्या दोघींचे कपडे फाडले आणि दोघींना अयोग्यपणे स्पर्श केला.
सकृतदर्शनी, जोपर्यंत आरोपीचा हेतू अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा होता, हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत पॉक्सो कायद्याच्या कलम ७ आणि कलम ८ अंतर्गत शिक्षा सुनावली जाऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले. हा विषय खटल्याचा आहे, असेही स्पष्ट केले. न्यायालयाने आरोपीची २५ हजार रुपयांचा जातमुचलका व दोन हमीदार सादर करण्याचे निर्देश देत जामिनावर सुटका केली.
..........................